Return   Facebook   Zip File

Obligatory

(चोवीस तासात एकदा स्तवन करण्याची प्रार्थना: जो कोणी ही प्रार्थना म्हणू इच्छितो त्याने किबलेहकडे [बाहजी, अक्का आराधनेचा बिंदु] उन्मुख व्हावे आणि जेव्हा तो आपल्या जागी उभा राहतो, त्यावेळी त्याने उजव्या आणि डाव्या बाजूस एकटक पहावे, जणू काय महादयानिधि, करुणानिधि अशा त्याच्या स्वामीच्या कृपेची प्रतीक्षा करीत आहे – नंतर त्याने म्हणावे)

हे तू सर्व नामांचा स्वामी आणि स्वर्गाचा निर्माता! सर्व श्रेष्ठ वैभवशाली व तुझ्या अदृश्य सारतत्वाच्या उदयस्थानाद्वारे मी तुझी याचना करतो की माझ्या प्रार्थनेद्वारे तुझ्या सौंदर्यापासून मला वंचित करणारी आवरणे भस्म करील असा अग्नी आणि तव सान्निध्य महासागराकडे मला नेईल असा प्रकाश उत्पन्न कर.

*(नंतर नम्रतेने त्याने आपले हात परमेश्वराकडे उंचवावेत -तो सर्वश्रेष्ठ आणि आशीर्वादित असो- आणि म्हणावे)

हे विश्वाच्या आकांक्षा आणि राष्ट्राच्या प्रियतमा! तू मला तुझ्याकडे उन्मुख झालेला, तुझ्या व्यतिरिक्त सर्वांपासून विमुक्त आणि तुझा दोर ज्याच्या हालचालीने संपूर्ण सृष्टी ढवळून निघाली आहे त्यास घट्ट पकडलेला पहातोस. हे माझ्या स्वामी, मी तुझा सेवक आहे आणि तुझ्या सेवकाचा पुत्र आहे. तुझी इच्छा आणि तुझी आकांक्षा यासाठी मला सदैव तत्पर असलेला आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य कशाचीही इच्छा न करणारा असा पहा. तुझ्या कृपेच्या महासागराद्वारे आणि तुझ्या कृपेच्या दिनमणिद्वारे मी तुझी याचना करतो की तू जसे इच्छितोस आणि प्रिय समजतोस तसे तुझ्या सेवकासाठी कर. सर्व वर्णन व स्तवने यापेक्षा सर्वोच्च अशा तुझ्या सामर्थ्यांची शपथ! जे काही तू प्रकट केले आहेस ते माझ्या हृदयाची आकांक्षा व माझ्या आत्म्याचे प्रियतम आहे. हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! माझ्या आशा व माझ्या कृत्यांकडे पाहू नकोस तर पृथ्वी आणि स्वर्ग यांना व्यापलेल्या इच्छेस पहा. हे तू सर्व राष्ट्रांच्या स्वामी, तुझ्या अति महान नामाची शपथ! जे काही तू इच्छिलेस, केवळ तेच मी इच्छिले आहे आणि तू ज्याच्यावर प्रेम करतोस केवळ त्याच्यावरच मी प्रेम करतो.

*(नंतर त्याने आपले गुडघे व डोके जमिनीला टेकून म्हणावे)

तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वर्णनापेक्षा आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही आकलनापेक्षा तू सर्वश्रेष्ठ आहेस.

*(नंतर त्याने उभे रहावे व म्हणावे)

हे माझ्या स्वामी, माझ्या प्रार्थनेस जीवनदायी जलाचा झरा बनव, ज्याच्या आधारे तुझी सर्वसत्ता जोवर राहील तोवर मी जगावे आणि तुझ्या विश्वांच्या प्रत्येक विश्वात तुझा उल्लेख करावा.

*(पुनः त्याने नम्रतेने आपले हात उंचवावेत आणि म्हणावे)

हे तू ज्याच्या वियोगाने हृदये आणि आत्मे वितळले आहेत आणि ज्याच्या प्रेमाग्नीने संपूर्ण जग ज्वलंत झाले आहे! ज्याद्वारे तू संपूर्ण सृष्टीस पराभूत केलेस त्या तुझ्या दिव्य नामाद्वारे मी तुझी याचना करतो की तुझ्याजवळ जे आहे ते माझ्यापासून राखून ठेवू नकोस, हे तू सर्व मानवांवर राज्य करणाऱ्या परमेश्वरा! हे माझ्या स्वामी, तू पहातोस ह्या अपरीचीतास तुझ्या ऐश्वर्याच्या छताखालील आणि तुझ्या दयेच्या आवारात असलेल्या त्याच्या अत्युच्च ग्रहाकडे धाव घेत असतांना ह्या उल्लंघनकर्त्यास तुझ्या क्षमाशीलतेच्या महासागराची, आणि ह्या दीनास तुझ्या वैभव दरबाराची आणि ह्या निर्धनास तुझ्या संपत्ती स्वरुपाची इच्छा करतांना पहातोस व तू जे काही इच्छितोस त्यासाठी आज्ञा करण्याचा तुझाच अधिकार आहे. मी साक्ष देतो की तूच तुझ्या कार्यांनी स्तवनीय आहेस आणि तुझ्या आज्ञांमध्ये पालनीय आहेस आणि तुझ्या आदेशाने अनिर्बंध राहतोस.

*(नंतर त्याने आपले हात वर करावेत व तीन वेळा महानतम नाम “अल्लाह-ओ-आभा” म्हणावे, त्यानंतर आपले हात गुडघ्यावर ठेवून परमेश्वरासमोर -तो सर्वश्रेष्ठ आणि आशीर्वादित असो- आणि म्हणावे)

हे माझ्या परमेश्वरा, तुझी उपासना करण्याच्या तीव्र इच्छेत आणि तुझे स्मरण व गुणगान करण्याच्या उत्कंठेत माझे चैतन्य माझ्या सर्वांगात कसे सळसळले आहे हे तू पहातोस. ज्यास तुझ्या दिव्य महान आज्ञेच्या दैवी जिव्हेने तुझ्या उद्घोषित राज्यात आणि तुझ्या ज्ञानाच्या स्वर्गात प्रमाणित केले ते ह्यास कसे साक्ष आहे हे तू पहातोस. ह्या अवस्थेत हे माझ्या स्वामी, तुझ्याजवळ जे आहे त्याची याचना करणे मला प्रिय आहे ज्यायोगे मी माझे दारिद्र्य दर्शवावे व तुझे औदार्य व तुझी संपन्नता याची वाखाणणी करावी आणि माझी सामर्थ्यहीनता घोषित करावी आणि तुझे सामर्थ्य व तुझी शक्ति प्रकट करावी.

*(नंतर त्याने उभे रहावे व दोन वेळा नम्रतेने आपले हात उंचवावेत व म्हणावे)

तुझ्या व्यतिरिक्त सर्व शक्तिमान, सर्व औदार्यशाली अन्य परमेश्वर नाही. तुझ्या व्यतिरिक्त अनादि व अनंत असा अन्य कोणी विधाता नाही. हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! तुझ्या क्षमाशिलतेने मला धीट बनविले आहे आणि तुझ्या दयेने मला बलवान केले आहे, तुझ्या आवाहनाने जागृत केले आहे आणि तुझ्या कृपेने मला उन्नत करून तुझ्याकडे मार्गदर्शन केले आहे. अन्यथा असा मी कोण आहे की जो तुझ्या सामिप्याच्या शहराच्या दरवाज्यात उभे राहण्याचे साहस करू शकेल किंवा तुझ्या इच्छेच्या स्वर्गात चकाकणाऱ्या प्रकाशाकडे माझे मुख वळवू शकेल? हे माझ्या स्वामी, हा तिरस्कृत प्राणी तुझ्या कृपेचे द्वार ठोठावताना आणि हा क्षणभंगूर आत्मा तुझ्या औदार्याच्या हातातून चिरकालीन जीवनाच्या सरितेची इच्छा करतांना तू पहातोस. हे सर्व नामाच्या स्वामी तुझा आदेश सदैव आहे, आणि स्वेच्छेने माझी अनासक्ति तुझ्या इच्छेला समर्पित आहे. हे स्वर्गाच्या निर्मात्या मी तुझ्या इच्छेच्या आधीन आहे.

*(नंतर त्याने आपले हात तीन वेळा उंचवावेत व म्हणावे)

सर्व महानांपेक्षा परमेश्वर अधिक महान आहे!

*(नंतर त्याने आपले गुडघे व डोके जमिनीला टेकवून म्हणावे)

तुझ्या समिप जे आहेत, तुझ्या सान्निध्याच्या स्वर्गाप्रत आरोहण करण्याकरीता त्यांनी केलेल्या स्तवनासाठी, तू अति उच्च किंवा तुझ्या महाद्वाराच्या दरवाजापर्यंत पोचवण्यास जे तुझ्यासाठी समर्पित झाले आहेत, त्यांच्या हृदय-पक्षांसाठी तू अति उच्च आहेस. मी साक्ष देतो की तू सर्व गुणांपलिकडे पुनित आणि सर्व नामांपलिकडे पवित्र राहिला आहेस. सर्व वैभवशाली आणि अति गौरवशाली, तुझ्या व्यतिरिक्त अन्य परमेश्वर नाही.

*(नंतर त्याने स्वतः बसावे व म्हणावे)

सर्व सृष्टीला आणि स्वर्गातील भक्तगण आणि सर्वोच्च नंदनवनातील निवासियांना आणि त्यांच्याही पलिकडे सर्व वैभवशाली क्षितिजावरून प्रत्यक्ष प्रतापाच्या वाणीने ज्याला प्रमाणित केले आहे की तूच परमेश्वर आहेस आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य परमेश्वर नाही आणि जो प्रगट झाला आहे तो गुप्त रहस्य, दिव्य संचायित प्रतीक आहे, ज्याद्वारे मूळाक्षरे ‘भ’ आणि ‘व’ (भव) जोडून एकत्र गुंफली आहेत त्यास मी साक्ष आहे. तो तोच आहे ज्याचे नाम सर्वोच्च लेखणीने अवतरित केले आहे आणि ज्याचा उल्लेख स्वर्ग व परमोच्च लोकाचे सिंहासन व पृथ्वीचा स्वामी त्या परमेश्वराच्या पवित्र ग्रंथात केला आहे, त्यास मी साक्ष आहे.

*(नंतर त्याने ताठ उभे राहून म्हणावे)

हे सर्व जीवमात्रांच्या स्वामी आणि दृश्य व अदृश्य अशा सर्व सृष्टीच्या विधात्या! तू माझे अश्रू व मी उच्चारलेले हुंदके जाणतोस, माझे कण्हणे, माझा विलाप तसेच माझ्या हृदयाचे आक्रोश ऐकतोस. तुझ्या शक्तिची शपथ! माझ्या दोषांनी मला तुझ्याजवळ आकर्षित होण्यापासून मागे ठेवले आहे, आणि माझ्या पापांनी मला तुझ्या पवित्र दरबारापासून फार दूर ठेवले आहे. हे माझ्या स्वामी, तुझ्या प्रेमाने मला संपन्न बनविले आहे आणि तुझ्या वियोगाने माझा नाश केला आहे आणि तुझ्या दूरत्वाने मला दग्ध केले आहे. ह्या विजनवासातील तुझ्या पाऊल खुणाद्वारे, ह्या विफलतेत तुझ्या निवडक भक्तांनी उच्चारलेल्या “मी येथे आहे, मी येथे आहे,” ह्या शब्दांद्वारे आणि तुझ्या साक्षात्काराचे श्वास आणि तुझ्या अवताराच्या अरुणोदयकालीन पावनलहरीद्वारे, मी तुझी विनवणी करतो की असे निर्धारित कर जेणेकरून तुझे सौंदर्य मी निरखावे आणि तुझ्या दिव्य ग्रंथात जे काही आहे त्याचे पालन करावे.

*(त्याने तीनदा महानतम नामाचा, “अल्लाह-ओ-आभा” पुनरुच्चार करावा, आणि गुडघ्यावर हात ठेवून ओणवे होऊन म्हणावे)

हे माझ्या परमेश्वरा, तुझे स्तवन असो की तू मला तुझे स्मरण व तुझे स्तवन करण्याचे सहाय्य केले आहेस व मला जो तुझ्या चिन्हांचे उदयस्थान आहे त्याची ओळख करून दिली आहेस आणि मला तुझ्या स्वामित्वासमोर नतमस्तक होण्यास, तुझ्या ईश्वरत्वासमोर विनम्र होण्यास आणि तुझ्या प्रतापाच्या वाणीने उद्घोषिलेले मान्य करण्यास कारण बनला आहे.

*(त्याने नंतर उठून म्हणावे)

हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! माझी पाठ माझ्या पापांच्या ओझ्याने वाकली आहे आणि माझ्या बेपर्वाईने माझा नाश केला आहे. ज्या ज्या वेळी मी माझ्या दुष्कर्मांवर आणि तुझ्या दानशीलतेवर मनन करतो तेव्हा माझे हृदय माझ्यामध्ये वितळते आणि माझे रक्त माझ्या नसांतून उसळते. तुझ्या सौंदर्याची शपथ, हे विश्वाच्या आकांक्षारुपा! तुझ्याकडे माझे मुख वर करून पाहतांना मी लाजतो आणि माझे आशायुक्त हात तुझ्या औदार्याच्या स्वर्गाकडे पसरण्यास लज्जित होतात. हे माझ्या परमेश्वरा, तू पहातोस की माझे अश्रू तुझे स्मरण करण्यापासून आणि तुझ्या सद्गुणांचे गुणगान करण्यापासून मला कसे प्रतिबंधित करतात. हे तू स्वर्ग व परमोच्च लोकांचे सिंहासन व पृथ्वीच्या स्वामी! मी तुझ्या राज्याची चिन्हे आणि तुझ्या अधिसत्तेची रहस्ये यांच्याद्वारे तुझी याचना करतो की हे सर्व जीवमात्रांच्या स्वामी, तुझे औदार्य, तुझ्या प्रियजनासाठी जसे असेल त्यानुरूप आणि हे दृश्य व अदृश्याच्या सम्राटा, तुझ्या कृपेस पात्र असेल तसे तू करावेस.

*(नंतर त्याने महानतम नाम “अल्लाह-ओ-आभा” तीन वेळा म्हणावे आणि आपले डोके व गुडघे जमिनीला टेकवून म्हणावे)

हे आमच्या परमेश्वरा, तुझे स्तवन असो, कारण तू आम्हास तुझ्याकडे आकर्षित करणारे आमच्यासाठी अवतरित केले आहेस जे, तुझ्या पवित्र ग्रंथातून व धर्मशास्त्रांतून प्रकट केलेली प्रत्येक्ष कल्याणप्रद गोष्ट आम्हास प्रदान केली आहेस. हे माझ्या स्वामी, आम्ही तुझी याचना करतो की पुष्कळसे निरर्थक भ्रम व निष्फळ कल्पना यापासून आमचे रक्षण कर. सत्यतः तू शक्तिमान, सर्व ज्ञाता आहेस.

*(नंतर त्याने आपले डोके वर करावे आणि बसून म्हणावे)

हे माझ्या परमेश्वरा, तुझ्या भक्तांनी जे प्रमाणित केले आहे त्यास मी साक्ष आहे आणि सर्वोच्च नंदनवनातील निवासियांनी तू तुझ्या बलशाली सिंहासनाभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांनी जे मानले आहे, ते मी मान्य करतो. हे विश्वांच्या स्वामी, पृथ्वी व स्वर्गाची राज्ये तुझीच आहेत.

#12499
- Bahá'u'lláh

 

(प्रतिदिन प्रातः, मध्यान्ह आणि सायंकाळी स्तवन करावी)

*(जो कोणी प्रार्थना करू इच्छितो, त्याने हात धुवावेत आणि ते धुताना म्हणावे)

हे माझ्या परमेश्वरा, माझे हात बळकट कर ज्यायोगे ते तुझ्या पवित्र ग्रंथाला असे निर्धारपूर्वक पकडू शकतील की जगातील सैन्य दलाचे सामर्थ्यही त्यासमोर प्रभावहीन ठरेल. त्याचे जे नाही त्याच्या हस्तक्षेपापासून त्याचे संरक्षण कर; सत्यतः तू सर्व शक्तिमान व अतिसामर्थ्यशाली आहेस.

*(आणि त्याने चेहरा धुतांना म्हणावे)

हे माझ्या स्वामी, मी माझे मुख तुझ्याकडे वळविले आहे. तुझ्या मुखमंडळाच्या प्रकाशाने त्याला उज्ज्वल कर. तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणाकडेही वळण्यापासून त्याचे रक्षण कर.

*(नंतर त्याने उभे राहून किबलेहकडे [बाहजी, अक्का आराधनेचा बिंदु] उन्मुख होऊन म्हणावे)

परमेश्वर प्रमाणित करतो की त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणी परमेश्वर नाही. साक्षात्काराची आणि सृष्टीची राज्ये त्याचीच आहेत. सत्यतः त्याने जे साक्षात्काराचे उदयस्थान आहे, त्यास प्रगट केले आहे, ज्याने सिनाईवर सुसंवाद केला, ज्याच्याद्वारे सर्वोच्च क्षितीज प्रकाशित करण्यात आले आणि जो दैवी लोट-वृक्ष ज्यापलिकडे मार्ग नाही, तो बोलला आणि ज्याद्वारे स्वर्ग व पृथ्वीवरील सर्वांसाठी आवाहन घोषित करण्यात आले: “पहा सर्वधारक आला आहे. पृथ्वी आणि स्वर्ग, वैभव आणि साम्राज्य परमेश्वराचेच आहेत, जो सर्व मानवांचा स्वामी आणि आकाश व पृथ्वीतळावरील परमोच्च लोकांच्या सिंहासनाचा अधिष्ठाता आहे!”

*(नंतर त्याने गुडघ्यावर हात टेकून ओणवे व्हावे आणि म्हणावे)

माझी स्तुति आणि माझ्या व्यतिरिक्त अन्य कुणाचीही स्तुति, माझे वर्णन आणि स्वर्ग व पृथ्वीवरील सर्वांच्या वर्णनांपेक्षा तू सर्वोच्च आहेस!

*(नंतर उभे राहून आपल्या मुखासमोर तळहात उघडे करून म्हणावे)

हे माझ्या परमेश्वरा, त्याला निराश करू नकोस, ज्याने याचना करणाऱ्या बोटांनी तुझी दया आणि कृपा यांची किनार घट्ट पकडली आहे. जे दया दाखवतात, त्या सर्वांपेक्षा महादयानिधि तूच आहेस.

*(नंतर त्याने बसावे व म्हणावे)

मी तुझे ऐक्य व तुझे एकत्व आणि तूच परमेश्वर आहेस आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य परमेश्वर नाही, ह्यास मी साक्ष आहे. सत्यतः तू तुझे धर्मकार्य प्रकट केले आहेस, तुझ्या करारनाम्याची पूर्तता केली आहेस आणि स्वर्ग व पृथ्वीवरील सर्व निवासियांसाठी तुझे कृपा द्वार सताड उघडे ठेवले आहेस. आशीर्वाद आणि शांती, अभिवादन आणि वैभव हे तुझ्या प्रियजनांना लाभो, ज्यांना जगातील परिवर्तने व अवसर यांनी तुझ्याकडे उन्मुख होण्यापासून परावृत्त केले नाही आणि ज्यांनी आपले सर्वस्व तुझ्यापाशी जे आहे ते मिळविण्याच्या आशेने अर्पण केले आहे. सत्यतः तू सदा क्षमाशील आणि सर्व कृपामय आहेस.

*(कोणी दिर्घ पदाऐवजी हे शब्द म्हणेल तरी पुरेसे आहे: “परमेश्वर प्रमाणित करतो की त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणी संकटी सहाय्यक, स्वयंभू असा परमेश्वर नाही.” तसेच त्याने बसतांना जर हे शब्द निवडले तरी पुरेसे आहे: “मी तुझे ऐक्य आणि तुझे एकत्व आणि तूच परमेश्वर आहेस आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणी परमेश्वर नाही ह्यास मी साक्ष आहे.”)

#12498
- Bahá'u'lláh

 

(दिवसात एकदा हात आणि तोंड धुवून बहाउल्लाह यांच्या समाधीच्या दिशेला (ईशान्य) तोंड करून उभे राहून दुपारी १२ ते ६ च्या दरम्यान म्हणावी.)

हे माझ्या परमेश्वरा, तुला जाणावे आणि तुझी उपासना करावी यासाठी तू मला निर्मिलेस यास मी साक्ष आहे. मी ह्या क्षणी माझी निर्बलता आणि तुझे सामर्थ्य, माझे दारिद्र्य आणि तुझी संपन्नता स्वीकारतो.

संकटी सहाय्यक, स्वयंभू असा तुजविण अन्य कोणी परमेश्वर नाही.

#12497
- Bahá'u'lláh

 

General

आध्यात्मिक गुण

हे परमेश्वरा! माझे चैतन्य ताजेतवाने आणि उल्हासित कर. माझे अंतःकरण शुद्ध कर. माझी सामर्थ्ये तेजस्वी कर. मी माझी सर्व कार्ये तुझ्या हाती सोपवितो. तू माझा मार्गदर्शक व आश्रय स्थान आहेस. मी कधीही दुःखी व शोकाकुल होणार नाही. मी सुखी व आनंदी राहीन. हे परमेश्वरा! मी कधीही चिंताग्रस्त होणार नाही, किंवा मी कधीही संत्रस्त होणार नाही. मी जीवनातील अप्रिय गोष्टींचा ध्यास करणार नाही.

हे परमेश्वरा! मी माझ्या स्वतःला जितका मित्र आहे, त्यापेक्षा अधिक तू माझा मित्र आहेस. हे स्वामी मी स्वतःस तुला समर्पित करतो.

#12522
- `Abdu'l-Bahá

 

हे माझ्या स्वामी, माझ्या प्रियतमा, माझ्या आकांक्षास्वरूपा! माझ्या एकांतात माझा सखा हो आणि माझ्या विजनवासात मला सोबत दे. माझे दुःख निवारण कर. तुझ्या सौंदर्यासाठी मला समर्पित होण्यायोग्य बनव. तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्वांपासून मला दूर ठेव. तुझ्या पावित्र्याच्या सुगंधाद्वारे मला आकर्षित कर. मला तुझ्या राज्यात त्यांच्याशी सलंग्न होण्यायोग्य बनव जे तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्वांपासून विलग झाले आहेत आणि जे तुझ्या पवित्र उंबरठ्यावर सेवा करण्याची तीव्र इच्छा बाळगतात आणि जे तुझ्या धर्मकार्यात सेवा देण्यास तत्पर राहतात. मला तुझी मर्जी संपादित केली आहे अशा सेविकापैकी एक बनण्यास समर्थ कर. सत्यतः तू कृपाळू, औदार्यशाली आहेस.

#12523
- `Abdu'l-Bahá

 

हे स्वामी! आम्ही अशक्त आहोत, आम्हास शक्ति दे. हे परमेश्वरा! आम्ही अज्ञानी आहोत, आम्हास ज्ञानी बनव. हे स्वामी! आम्ही दरिद्री आहोत, आम्हास धनवान बनव. हे परमेश्वरा! आम्ही मृत आहोत, आम्हास सचेतन कर. हे स्वामी! आम्ही स्वतः अवमानित आहोत, तुझ्या राज्यात आम्हाला वैभवशाली बनव. हे स्वामी, जर तू आम्हास सहाय्य केलेस तर आम्ही चमकणारे तारे बनू. जर तू आम्हास सहाय्य केले नाहीस तर आम्ही पृथ्वीच्याही खालच्या पातळीचे बनू. हे स्वामी! आम्हास बलवान कर. हे परमेश्वरा! आम्हाला विजय प्रदान कर. हे परमेश्वरा! आम्हाला स्वार्थ व वासना यांवर विजय मिळविण्यास समर्थ कर. हे स्वामी! भौतिक विश्वाच्या बंधनातून आम्हास मुक्त कर. हे स्वामी! आम्हास पवित्र आत्म्याच्या श्वासाद्वारे सचेतन कर जेणेकरून आम्ही तुझी सेवा करण्यास उद्युक्त होऊ, तुझी उपासना करण्यास मग्न राहू आणि तुझ्या साम्राज्यात अत्यंत प्रामाणिकपणे स्वतः प्रयत्नशील राहू. हे स्वामी, तू सामर्थ्यशाली आहेस! हे परमेश्वरा, तू क्षमाशील आहेस! हे स्वामी, तू करुणामय आहेस!

#12524
- `Abdu'l-Bahá

 

आध्यात्मिक संसद

(ज्यावेळी तुम्ही बैठकीच्या कक्षात प्रवेश करता, त्यावेळी परमेश्वराच्या प्रेमाने उत्तेजित अंतःकरणाने आणि त्याच्या स्मरणांव्यतिरिक्त अन्य सर्वांपासून शुद्ध झालेल्या वाणीने ही प्रार्थना म्हणावी जेणेकरून सर्वसामर्थ्यशाली प्रभू तुम्हाला सर्वोच्च विजय संपादन करण्यास कृपाळूपणे सहाय्य करील.)

हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! आम्ही तुझे सेवक आहोत जे भक्तिभावाने तुझ्या पवित्र मुखाकडे वळलो आहोत आणि ह्या वैभवशाली दिवसात तुझ्या व्यतिरिक्त सर्वांपासून स्वतःला अनासक्त केले आहे. आम्ही ह्या आध्यात्मिक सभेत आपले दृष्टीकोन व विचारांनी एकमत होऊन तुझ्या वचनांचे मानवजातीत उद्घोषण करण्याच्या एकाच उद्देशाने एकत्रित जमलो आहोत. हे स्वामी, आमच्या परमेश्वरा! आम्हास तुझ्या दैवी मार्गदर्शनाची चिन्हे, मानवांमध्ये तुझ्या गौरवशाली धर्माची प्रमाणे, तथा तुझ्या शक्तिशाली करारनाम्याचे सेवक बनव. हे आमच्या सर्वोच्च स्वामी! आम्हास तुझ्या आभा साम्राज्यातील तुझ्या दैवी एकतेची प्रगटीकरणे आणि सर्व प्रदेशावर चकाकणारे तेजस्वी तारे बनव. स्वामी! आम्हांला तुझ्या अलौकिक कृपेच्या लाटांनी उचंबळणारे सागर, तुझ्या सर्व वैभवशाली शिखरावरून प्रवाहित होणारे झरे, तुझ्या स्वर्गीय धर्मकार्याच्या वृक्षावरील सुमधुर फळे, तथा तुझ्या स्वर्गीय नंदनवनातील तुझ्या कृपेच्या पवन लहरींनी डोलणारे वृक्ष बनविण्यास सहाय्य कर. हे परमेश्वरा! आमच्या आत्म्यांना तुझ्या दैवी एकतेच्या पदावर अवलंबित कर, तुझ्या कृपावर्षावांनी आमची हृदये उल्हासित कर ज्यायोगे आम्ही एका सागराच्या लाटाप्रमाणे एक होऊ आणि तुझ्या तेजस्वी प्रकाशाच्या किरणाप्रमाणे एकमय होऊ, जेणेकरून आमचे विचार, आमचे दृष्टीकोन, आमच्या भावना सर्व जगभर ऐक्याचे चैतन्य प्रगट करणारी एक वास्तवता बनेल. तू औदार्यशाली, कृपामय, दाता, सर्व शक्तिमान, दयामय, करुणामय आहेस.

#12507
- `Abdu'l-Bahá

 

आरोग्य

हे माझ्या परमेश्वरा! तुझे नाम माझे आरोग्य आहे आणि तुझे स्मरण हाच माझा उपचार आहे. तुझे सान्निध्य माझी आशा आहे आणि तुझ्या विषयीचे प्रेम माझी सोबत आहे. तुझी माझ्यावरील दया माझे आरोग्य आहे व मला इह व परलोकी सहाय्यक आहे. तू खरोखर सर्व कृपामय, सर्वज्ञ, सर्व बुद्धिमान आहेस.

#12506
- Bahá'u'lláh

 

उष:काल

हे माझ्या परमेश्वरा आणि माझ्या स्वामी! मी तुझा सेवक व तुझ्या सेवकाचा पुत्र आहे. मी ह्या उष:काली माझ्या अंथरुणावरून उठलो आहे, जेव्हा तुझ्या आज्ञेच्या दिव्यग्रंथांत निर्धारित झाल्याप्रमाणे तुझ्या एकत्वाचा दिनमणी तुझ्या इच्छेच्या उदयस्थानावरून प्रकाशित झाला असून त्याचे तेज संपूर्ण विश्वावर पसरले आहे.

हे मम प्रभो, तुझे स्तवन असो की आम्ही तुझ्या ज्ञान प्रकाशाच्या तेजोवलयांसाठी जागे झालो आहोत. हे माझ्या स्वामी, आम्हास असे वरदान दे जे तुझ्या व्यतिरिक्त सर्वांपासून विलग ठेवील आणि तुझ्या व्यतिरिक्त सर्व आसक्तिपासून आम्हास मुक्त करील. तसेच माझ्यासाठी व माझे प्रियजन आप्तेष्ट, स्त्री व पुरुष यासर्वांसाठी सारखेच इहपरलोकीचे कल्याण अंकित कर. हे संपूर्ण निर्मितीच्या प्रियतमा आणि अखिल विश्वाच्या आकांक्षास्वरूपा, आम्हास तुझ्या सुनिश्चित संरक्षणाद्वारे त्यांच्यापासून सुरक्षित ठेव ज्यांना तू दुष्ट निंदकाची रूपे म्हणून बनविले व जे मानवांच्या हृदयात तुर्ककुतर्क करतात. तुला जे प्रिय आहे ते करण्यास तू समर्थ आहेस. सत्यत: तू सर्व शक्तिमान, संकटी सहाय्यक व स्वयंभू आहेस.

हे स्वामी माझ्या परमेश्वरा! तू ज्यांना आपल्या सर्वोत्तम पदव्या प्रदान केल्या आहेस आणि ज्याद्वारे तू सज्जन व दुर्जनांमध्ये अंतर केले आहेस त्यांना आशीर्वादित कर आणि तुला जे प्रिय आहे व तुला इच्छित आहे ते करण्यास आम्हास कृपाळूपणे सहाय्य कर. तसेच हे ममप्रभो, जे तुझे दिव्य शब्द व अक्षरे आहेत आणि ज्यांनी आपली मुखमंडळे तुझ्यावर केंद्रित केली आहेत आणि जे तुझ्याकडे उन्मुख झाले आहेत आणि तुझी हाक ज्यांनी ऐकली आहे त्यांना आशीर्वाद दे.

सत्यमेव तू सर्व मानवांचा स्वामी तथा सम्राट आणि सर्व सृष्टिचा नियंता आहेस.

#12500
- Bahá'u'lláh

 

ऐक्य

हे परमेश्वरा, मानवजातीवरील तुझ्या प्रेमाच्या प्रकटीकरणासाठी तुझा जयजयकार असो! आमचे जीवन आणि प्रकाश असणाऱ्या हे प्रभो, तुझ्या सेवकांना तुझ्या पथावर मार्गदर्शन कर आणि तुझ्या ठायी आम्हाला समृद्ध कर आणि तुझ्या व्यतिरिक्त सर्वांपासून मुक्त कर.

हे परमेश्वरा, आम्हाला तुझ्या एकत्वाची शिकवण दे आणि तुझ्या एकतेची आम्हाला जाणीव करून दे, ज्यायोगे तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणासही आम्ही पाहणार नाही. तू दयाळू आणि कृपादाता आहेस.

हे परमेश्वरा, तुझ्या प्रियतमांच्या हृदयात तुझा प्रेमाग्नि निर्माण कर ज्याद्वारे तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्वांचा विचार त्यांत दग्ध होईल.

हे परमेश्वरा, तुझे गौरवशाली शाश्वत स्वरूप आम्हास प्रकट कर, जेणेकरून तू सदा सनातन आहेस व सदा सनातन राहशील आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य परमेश्वर नाही. सत्यतः तुझ्या मध्येच आम्हाला सुख व शक्ति लाभेल.

#12515
- Bahá'u'lláh

 

हे माझ्या ईश्वरा, हे माझ्या परमेश्वरा! तुझ्या सेवकांची हृदये एक कर आणि तुझा महान हेतु त्यांना प्रकट कर. तुझ्या आज्ञेचे ते अनुसरण करोत आणि तुझ्या कायद्याचे पालन करोत. हे परमेश्वरा, त्यांच्या प्रयत्नात तू त्यांना सहाय्य कर, आणि तुझी सेवा करण्यासाठी त्यांना शक्ति दे. हे परमेश्वरा, त्यांना एकाकी सोडू नकोस तर तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने त्यांच्या पावलांना मार्गदर्शन कर आणि तुझ्या प्रेमाने त्यांची हृदये उल्हासित कर. सत्यतः तूच त्यांचा सहाय्यकर्ता आणि त्यांचा स्वामी आहेस.

#12516
- Bahá'u'lláh

 

हे परमेश्वरा, तुझ्या ऐक्याच्या प्रकाशाने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकावी आणि “साम्राज्य परमेश्वराचे आहे” अशी मोहर सर्व मानवांच्या भालप्रदेशी मुद्रांकित व्हावी असे वरदान दे.

#12517
- Bahá'u'lláh

 

करारनाम्यावर अढळता

हे स्वामी, माझ्या परमेश्वरा! तुझ्या प्रियजनांना तुझ्या धर्मश्रद्धेत दृढ राहण्यास, तुझ्या मार्गावरून मार्गक्रमण करण्यास, तुझ्या धर्मकार्यात अढळ राहण्यास सहाय्य कर. स्वार्थ व वासना यांच्या प्रखर हल्ल्यासमोर टिकाव धरण्यासाठी आणि दैवी मार्गदर्शनाचा प्रकाश अनुसरण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे. तू सामर्थ्यशाली, औदार्यशाली, स्वयंभू वरदाता, करुणामय, सर्वशक्तिशाली आणि सर्वकृपामय आहेस.

#12525
- `Abdu'l-Bahá

 

कसोट्या व अडचणी

परमेश्वरा व्यतिरिक्त, संकटांचा अन्य परिहारक कोण आहे? म्हणा: परमेश्वर स्तुत्य आहे! तो परमेश्वर आहे! सर्व त्याचे सेवक आहेत आणि सर्वजण त्याच्या आज्ञेचे पालन करतात.

#12521
- The Báb

 

न्याय

म्हणा: हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! न्याय मुकुटाने माझे शिर आणि समतेच्या अलंकाराने माझे देह मंदिर सुशोभित कर. सत्यतः तूच सर्व देणग्या व औदार्य यांचा स्वामी आहेस.

#12518
- Bahá'u'lláh

 

प्रवास

हे माझ्या परमेश्वरा, तुझ्या कृपेने ह्या प्रभातकाळी मी जागृत झालो आणि तुझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून आणि तुझ्या दक्षतेस स्वतःला अर्पित करून मी माझे घर सोडित आहे. तेव्हा तुझ्या दयेच्या स्वर्गातून तुझ्यावतीने मजसाठी वरदान प्रदान कर आणि तुझ्यावर निश्चितपणे बिंबलेल्या माझ्या विचारांनी तुझ्या संरक्षणाखाली निघण्यासाठी जसे तू मला समर्थ केलेस, तसेच सुरक्षितपणे घरी परतण्यास सहाय्य कर.

तुझ्या व्यतिरिक्त एकमेव, अतुल्य, सर्वज्ञाता, सर्वबुद्धिमान अन्य कोणी परमेश्वर नाही.

#12502
- Bahá'u'lláh

 

प्रशिक्षण

हे ईश्वरा, हे परमेश्वरा! हा विदीर्ण पंखाचा पक्षी असून त्याची भरारी अति मंद आहे, त्याला सहाय्य कर, ज्यायोगे तो समृद्धीच्या आणि मोक्षाच्या शिखराकडे उड्डाण करू शकेल, असीम अंतराळातून अति आनंदाने आणि आमोदाने आपल्या मार्गावर भ्रमण करील. तुझ्या सर्वोच्च नामाने त्याचा मधुर स्वर सर्व प्रदेशात उन्नत होईल, ह्या आवाहनाने कानांना अतिव आनंद देईल, आणि दिव्य मार्गदर्शनाची चिन्हे पाहून नेत्र तेजस्वी होतील.

हे स्वामी! मी एकटा, एकाकी आणि दीन आहे. मला तुझ्या व्यतिरिक्त अन्य आधार नाही, तुझ्याशिवाय अन्य सहाय्यक नाही आणि तुझ्या विरहित माझा अन्य पोषणकर्ता नाही. तुझ्या सेवेत मला दृढ कर, तुझ्या देवदूतांच्या समूहांकरवी मला सहाय्य कर, तुझ्या वचनांच्या प्रसारामध्ये मला विजयी बनव आणि तुझ्या प्राणीमात्रांमध्ये तुझ्या बुद्धीमत्तेचे कथन करण्यास मला उद्युक्त कर. सत्यतः, तू दुर्बलांचा सहाय्यक आणि दीनांचा संरक्षणकर्ता आहेस आणि सत्यतः, तू सामर्थ्यशाली, शक्तिमान आणि अनिर्बंध आहेस.

#12527
- `Abdu'l-Bahá

 

प्रात:काल

हे माझ्या परमेश्वरा, तुझ्या आश्रयस्थानी मला जाग आली आहे आणि तुझ्या संरक्षणाच्या पवित्र अभयस्थानी व तुझ्या सुरक्षिततेच्या किल्ल्यात वास्तव्यासाठी जो आश्रयस्थान शोधतो, हे त्यास योग्य आहे. हे माझ्या स्वामी, माझे अंतरंग तुझ्या साक्षात्काराच्या उदयस्थानावरील तेजोवलयांनी प्रकाशित कर जसे तू माझे बहिरंग तुझ्या अनुग्रहाच्या प्रभात किरणांनी प्रकाशित केले.

#12501
- Bahá'u'lláh

 

बहाई कोषासाठी योगदान

(परमेश्वराच्या सर्व मित्रांनी आपल्या कुवतीनुरूप योगदान केले पाहिजे, मग ते दान कितीही सामान्य का असेना. परमेश्वर एखाद्या आत्म्यावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भार टाकीत नाही. अशी योगदाने सर्व केंद्रांवर व सर्व भाविकांकडून आली पाहिजेत. हे परमेश्वराच्या मित्रांनो! या योगदानांच्या बदल्यात तुमची शेती, तुमचा उद्योग आणि तुमचा व्यवसाय उत्तम देणग्या व वरदाने याद्वारे अनेक पटीच्या वाढीने आशीर्वादित होईल याची तुम्ही खात्री बाळगा. जो कोणी एक सत्कृत्याने पुढे येतो त्याला दस पट पारितोषिक लाभेल. जे त्याच्या मार्गावर आपली संपत्ती खर्च करतात, त्यांना जीवित स्वामी विपुलता बहाल करील हे निःसंशय आहे.)

हे ईश्वरा! माझ्या परमेश्वरा! तुझ्या खऱ्या भक्तांचे भालप्रदेश उज्ज्वल कर आणि सुनिश्चित विजयाच्या देवदूत समूहांकरवी त्यांना आधार दे. तुझ्या सरळ मार्गावर त्यांचे पाय दृढ कर आणि तुझ्या सनातन कृपाप्रसादातून त्यांच्यासमोर तुझ्या अनुग्रहांची प्रांगणे उघड; कारण जे काही तू त्यांच्यावर प्रदान केले आहेस, त्याचा तुझ्या मार्गावर तुझ्या धर्माला सुरक्षित ठेवून, तुझ्या स्मरणावर आपला विश्वास ठेवून, तुझ्या प्रेमासाठी आपली अंतःकरणें अर्पित करून, तुझ्या सौंदर्याची आराधना आणि तुला प्रसन्न करण्याच्या मार्गांच्या शोधात आपल्या जवळ जे काही आहे ते राखून न ठेवता त्याचा विनियोग करीत आहेत.

हे माझ्या स्वामी! त्यांच्यासाठी विपुल भाग, निहित मोबदला आणि निश्चित पारितोषिक निर्धारित कर.

सत्यत: तूच एकमेव पोषणकर्ता, सहाय्यक, उदार, कृपामय व सदैव वरदाता आहेस.

#12512
- `Abdu'l-Bahá

 

बालके

हे परमेश्वरा! ह्या लहान बालकाचे तुझ्या प्रेमळ हृदयी संगोपन कर आणि तुझ्या विधानाच्या वक्षस्थळातून मिळणाऱ्या दुधाने त्याचे पोषण कर. तुझ्या प्रेमाच्या गुलाब उद्यानात ह्या नवीन रोपट्याची जोपासना कर, आणि तुझ्या कृपा वर्षावाद्वारे त्याच्या वाढीस सहाय्य कर. त्याला दिव्य राज्याचे बालक बनव आणि तुझ्या स्वर्गीय राज्याकडे त्याचे मार्गदर्शन कर. तू समर्थ आणि दयाळू आहेस आणि तू दाता, औदार्यशाली व अद्वितीय वरदानांचा स्वामी आहेस.

#12508
- `Abdu'l-Bahá

 

हे परमेश्वरा! ह्या बालकांना शिक्षित कर. ही बालके, तुझ्या फलोद्यानातील रोपटी, तुझ्या मळ्यातील फुले तथा तुझ्या बागेतील गुलाब आहेत. तुझा ज्ञान-वर्षाव त्यांच्यावर होऊ दे. तुझ्या प्रेमाने त्यांच्यावर सत्यसुर्य चमकू दे. तुझ्या वायुलहरीने त्यांना ताजेतवाने कर, जेणेकरून ती प्रशिक्षित होतील, त्यांची वाढ व विकास होईल आणि ती अतिसुंदर दिसतील. तू दाता आहेस, तू करुणामय आहेस.

#12509
- `Abdu'l-Bahá

 

हे परमेश्वरा मला मार्गदर्शन कर, माझे संरक्षण कर, मला प्रकाशणारा दिपक व तेजस्वी तारा बनव. तूच शक्तिशाली व सामर्थ्यशाली आहेस.

#12510
- `Abdu'l-Bahá

 

मृतांसाठी

हे माझ्या परमेश्वरा! हा तुझा सेवक आणि तुझा सेवक पुत्र आहे, ज्याने तुझ्यावर व तुझ्या चिन्हांवर विश्वास ठेवला आहे आणि जो तुझ्याकडे तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्वांपासून संपूर्ण अनासक्त होऊन उन्मुख झाला आहे. खरोखर, जे दया दाखवितात त्यांच्यापैकी तू सर्व दयाळू आहेस.

हे तू मानवांच्या पापांना क्षमा करणाऱ्या व त्यांच्या दोषांना झाकून टाकणाऱ्या विधात्या, त्याला असे वागव जसे तुझ्या कृपेच्या स्वर्गाला व तुझ्या औदार्याच्या महासागराला साजेसे होईल. स्वर्ग व पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीपासून असणाऱ्या तुझ्या सर्वश्रेष्ठ दयेच्या आवारात त्याला प्रवेश प्रदान कर. तुझ्या व्यतिरिक्त सदा क्षमाशील, सर्व औदार्यशाली अन्य परमेश्वर नाही.

(नंतर सहा वेळा “अल्लाह-ओ-आभा” ह्या अभिवादनाचा पुनरुच्चार करावा, आणि नंतर खालील प्रत्येक पदाचा एकोणीस वेळा पुनरुच्चार करावा.)

आम्ही सर्व, सत्यतः परमेश्वराची उपासना करतो.

आम्ही सर्व, सत्यतः परमेश्वरासमोर नतमस्तक होतो.

आम्ही सर्व, सत्यतः परमेश्वरास समर्पित आहोत.

आम्ही सर्व, सत्यतः परमेश्वराचे स्तवन करतो.

आम्ही सर्व, सत्यतः परमेश्वराचे आभार मानतो.

आम्ही सर्व, सत्यतः परमेश्वरात सहिष्णु आहोत.

(जर मृत व्यक्ती स्त्री असेल तर असे म्हणावे, ही तुझी सेविका आणि तुझ्या सेविकेची सुपुत्री आहे.)

#12513
- Bahá'u'lláh

 

हे माझ्या परमेश्वरा! हे पापांच्या क्षमाकर्त्या, देणग्यांच्या वरदात्या आणि दुःखहर्त्या!

सत्यतः मी तुझी याचना करतो की त्यांच्या पापांना क्षमा कर, ज्यांनी भौतिक पोषाखाचा परित्याग केला आहे आणि आध्यात्मिक विश्वाकडे आरोहण केले आहे.

हे माझ्या स्वामी! पापांपासून त्यांना शुद्ध ठेव, त्यांची दु:खे हरण कर, आणि त्यांचा अंधःकार प्रकाशात परिवर्तित कर. सुखाच्या उपवनात प्रवेश करण्यास त्यांना सहाय्य कर. अति शुद्ध पाण्याने त्यांना स्वच्छ कर आणि सर्वोच्च पर्वतावरील तुझे सौंदर्य त्यांना पाहू दे.

#12514
- `Abdu'l-Bahá

 

मदत

हे माझ्या परमेश्वरा! तुझ्या अति वैभवशाली नामाद्वारे मी तुझी याचना करतो की तुझ्या सेवकांच्या कार्याची भरभराट व तुझ्या नगरांची समृद्धि करण्यास मला सहाय्य कर. खरोखर, तुझी सर्व सृष्टिवर सत्ता आहे.

#12519
- Bahá'u'lláh

 

स्वामी! आम्ही दयनीय आहोत, तवकृपेचे आम्हास वरदान दे; आम्ही दरिद्री आहोत, आमच्यावर तुझ्या संपत्ति महासागरातून एक भाग प्रदान कर; आम्ही गरजू आहोत, आमचे समाधान कर; आम्ही हीन आहोत, आम्हाला तुझे वैभव दे. प्रतिदिनी आकाशातील पाखरे आणि भूमीवरील पशु यांना त्यांचे भक्ष्य तुझ्याकडूनच मिळते आणि सर्व प्राणीमात्र तुझी दक्षता आणि प्रेमळ दयेचा लाभ घेतात.

ह्या दुर्बलास तुझ्या अलौकिक कृपेपासून वंचित करू नकोस आणि ह्या असहाय्य आत्म्यासाठी, तुझ्या शक्तिद्वारे तुझी कृपा राखून ठेव.

आम्हाला आमचे दैनिक भोजन दे आणि जीवनाच्या गरजांच्या पूर्तीत तुझ्या संवर्धनाचे वरदान दे, ज्यायोगे आम्ही तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणावरही विसंबून राहू नये, पूर्णपणे तुझ्याशी तल्लीन व्हावे, तुझ्या मार्गावरून मार्गक्रमण करावे आणि तुझी रहस्ये घोषित करावीत. तू सर्व शक्तिमान आणि प्रेमळ आणि सर्व मानवजातीचा पालनकर्ता आहेस.

#12520
- `Abdu'l-Bahá

 

युवक

हे स्वामी! ह्या तरुणास तेजस्वी बनव आणि ह्या दीन प्राण्यावर तुझा कृपा-प्रसाद प्रदान कर. त्याला ज्ञान दान दे, प्रत्येक प्रभात समयी त्याला अधिकाधिक शक्ती प्रदान कर, आणि त्याला तुझ्या संरक्षणाच्या आश्रयस्थानी सुरक्षित ठेव जेणेकरून तो चुकांपासून मुक्त होईल, तुझ्या धर्मकार्याच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेईल, पथभ्रष्टांना मार्गदर्शन करील, दुर्दैविंना मार्ग दाखवील, बंदिवानांना मुक्त करील आणि दुर्लक्ष करणाऱ्यांना जागृत करील, ज्यायोगे तुझ्या स्मरणाने व स्तवनाने सर्व आशीर्वादित होतील. तूच शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली आहेस.

#12511
- `Abdu'l-Bahá

 

रात्रीकाल

हे माझ्या परमेश्वरा, माझ्या स्वामी, माझ्या आकांक्षेच्या एकमेव ध्येया! हा तुझा सेवक, तुझ्या दयेच्या आश्रयाखाली झोपू इच्छितो आणि तुझ्या कृपेच्या छत्राखाली तुझ्या दक्षतेची आणि तुझ्या संरक्षणाची याचना करीत विसावा घेऊ इच्छितो.

हे माझ्या स्वामी, मी तुझी याचना करतो की तुझ्या व्यतिरिक्त अन्य काहीही पाहण्यापासून माझ्या नेत्रांचे संरक्षण कर. तुझ्या कधीही निद्रीस्त न होणाऱ्या नेत्रांद्वारे त्यांची दृष्टि बळकट कर की ज्यायोगे ते तुझी चिन्हे ओळखू शकतील आणि तुझ्या साक्षात्काराचे क्षितिज पाहू शकतील. तू तोच आहेस ज्याच्या सर्वसमर्थतेच्या प्रकटीकरणांसमोर सामर्थ्याचे सारतत्व कंपित झाले आहे.

तुझ्या व्यतिरिक्त सर्वसमर्थ, सर्वविजेता, अनिर्बंध असा अन्य परमेश्वर नाही.

#12503
- Bahá'u'lláh

 

विवाह

हे माझ्या परमेश्वरा, तुझा गौरव असो! खरोखर हा तुझा सेवक व ही तुझी सेविका तुझ्या दयेच्या छायेत एकत्रित आले आहेत, आणि तुझ्या अनुग्रह व औदार्याद्वारे ते एक झाले आहेत. हे स्वामी! ह्या तुझ्या विश्वात व तुझ्या साम्राज्यात त्यांना सहाय्य कर आणि तुझा आशीर्वाद व कृपा याद्वारे त्यांच्यासाठी प्रत्येक कल्याण निहित कर. हे स्वामी! तुझ्या दास्यात त्यांना दृढ कर आणि तुझ्या सेवेत त्यांना सहाय्य कर. तुझ्या विश्वातील तुझ्या नामाची चिन्हे त्यांना होऊ दे आणि ह्या व येणाऱ्या जगातील तुझ्या अक्षय वरदानांद्वारे त्यांचे संरक्षण कर. हे स्वामी! तुझ्या दयाळूपणाच्या साम्राज्यास सन्मुख होऊन ते वंदन करतात व तुझ्या एकत्वाच्या राज्यास सन्मुख होऊन प्रार्थना करतात. खरोखर तुझ्या आदेशाच्या आज्ञापालनात ते विवाहबद्ध झाले आहेत. काळाच्या अंतापर्यंत त्यांना सख्यत्व व ऐक्य यांची चिन्हे बनण्यास कारणीभूत हो. खरोखर तू सर्वसमर्थ, सर्वव्यापी व सर्वशक्तिमान आहेस.

#12505
- `Abdu'l-Bahá

 

संरक्षण

हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! तुझ्या निष्ठावंत सेवकांचे स्वार्थ व वासनांच्या अनिष्टापासून रक्षण कर, तुझ्या प्रेममय दयेच्या जागरूक नेत्राद्वारे सर्व शत्रुत्व, द्वेष आणि मत्सर यांपासून त्यांचे रक्षण कर, तुझ्या दक्षतेच्या अभेद्य किल्ल्यात त्यांना आश्रय दे आणि संशयाच्या प्रहारांपासून त्यांना सुरक्षित ठेव, त्यांना तुझ्या वैभवशाली चिन्हांचे आविष्कार बनव, तुझ्या दैवी एकतेच्या उदयस्थानावरून पसरणाऱ्या तेजस्वी किरणांद्वारे त्यांचे चेहरे उज्ज्वल कर, तुझ्या पवित्र राज्यातून प्रकटलेल्या पदांद्वारे त्यांची अंतःकरणे उल्हासित कर, तुझ्या वैभव साम्राज्यापासून येणाऱ्या तुझ्या सर्व प्रभावशाली सामर्थ्याद्वारे त्यांच्या कंबरा बळकट कर. तू सर्व औदार्यशाली, संरक्षणकर्ता, सर्वशक्तिमान, कृपाळू आहेस.

#12526
- `Abdu'l-Bahá

 

Occasional

उपवास

हे स्वामी, माझ्या परमेश्वरा, तुझे स्तवन असो. ज्या साक्षात्काराद्वारे अंध:कार प्रकाशात परिवर्तित झाला, ज्यामुळे गजबजलेले मंदिर बांधण्यात आले, लिखित पत्रिका प्रकट झाली आणि पसरलेल्या पत्रिकांचा गुंडाळा उघड झाला, त्याद्वारे मी तुझी याचना करतो की मला व माझ्या सोबत असलेल्यांना असे वरदान दे जे तुझ्या सर्वव्यापी वैभवाच्या स्वर्गामध्ये उड्डाण करण्यास आम्हास समर्थ करील आणि जे आम्हाला संशयांच्या अशा कलंकापासून धुवून काढील ज्यांनी शंका करणाऱ्यास तुझ्या एकतेच्या सभामंडपात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे.

हे माझ्या स्वामी, मी असा एक सेवक आहे ज्याने तुझ्या प्रेमळ दयेचा दोर घट्ट पकडला आहे आणि तुझी कृपा आणि अनुग्रह यांच्या किनारीस बिलगला आहे. माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी इहपरलोकीचे कल्याण निर्धारित कर. नंतर तुझ्या प्राणीमात्रांमधील अति निवडकांसाठी निर्धारित केलेली रहस्यमय भेट त्यांना प्रदान कर.

हे माझ्या स्वामी हेच ते दिवस आहेत जेव्हा तू तुझ्या सेवकांना उपवास पाळावयाची आज्ञा केली आहेस. तो आशीर्वादित आहे जो सर्वस्वी तुझ्याकरिता आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्व वस्तूंपासून निखालस अनासक्त राहून उपवासाचे पालन करतो. हे माझ्या स्वामी, मला व त्यांना तुझे आज्ञापालन करण्यास व तुझे नियम पाळण्यास सहाय्य कर. खरोखर तू जे निवडतोस ते करण्याचे तुला सामर्थ्य आहे.

तुझ्या व्यतिरिक्त सर्वज्ञाता, सर्वबुद्धिमान अन्य परमेश्वर नाही. सर्व विश्वांच्या स्वामीच्या परमेश्वराचा जयजयकार असो.

#12504
- Bahá'u'lláh

 

Tablets

अहमदची पत्रिका

ह्या दैनिक अनिवार्य प्रार्थना, इतर काही विशिष्ट प्रार्थनासह एकत्र म्हणाव्यात, जशा, आरोग्याची प्रार्थना, अहमदची पत्रिका यांच्यात बहाउल्लाह कडून विशेष प्रभाव व विशेषता बहाल करण्यात आल्या आहेत आणि म्हणून त्यासारख्या मान्य करण्यात याव्यात आणि भाविकांनी निर्विवाद श्रध्दा व आत्मविश्वास यांसह त्यांचे पठन केले पाहिजे, म्हणजे त्यांच्याद्वारे त्यांनी परमेश्वराशी अधिक जवळीकीने तन्मय व्हावे आणि त्याचे कायदे व प्रमाणे यांच्याशी अधिक पूर्णत्वाने स्वतःस परिचीत करावे.

-शोघी एफेंदी

परमेश्वर सम्राट, सर्वज्ञ, सर्व बुद्धिमान आहे!

ऐका, सनातनाच्या वृक्ष शाखांवर बसून स्वर्गीय कोकिळा सुस्वर पावन सुरांनी ईश्वर सामिप्याची आनंद-वार्ता निष्ठावंतांना प्रगट करीत, भाविकांना दैवी ऐक्यामध्ये, औदार्यसंपन्न परमेश्वरी सान्निद्याच्या दरबाराकडे बोलावीत, अतुल्य वैभवसंपन्न सम्राट परमेश्वराने प्रगट केलेल्या संदेशाची विभक्त जनांना माहिती देत, पावित्र्याच्या सिंहासनाकडे आणि ह्या तेजोमय दिव्य सौंदर्याकडे आपल्या भक्तांचे मार्गदर्शन करून मधुर गान करीत आहे.

ज्याच्याद्वारे सत्य हे प्रमादापासून वेगळे ओळखले जाईल आणि प्रत्येक आज्ञेची बुद्धिनिष्ठा पारखली जाईल, असे त्या दैवीदूताच्या दिव्य ग्रंथांतून भाकित झाले, ते अत्यंत महान दिव्य सौंदर्य, निःसंशय हेच आहे. अतिउन्नत, शक्तीशाली, महान अशा परमेश्वराची सुमधूर फळे देणारा जीवन वृक्ष, निःसंशय तोच आहे.

हे अहमद! निःसंशय तो परमेश्वर आहे आणि सम्राट, संरक्षणकर्ता प्रभू, अतुलनीय, आणि सर्वशक्तीमान असा त्याशिवाय अन्य कोणी परमेश्वर नाही, आणि ज्याला अली (परम पावन बाब) ह्या नामाने परमेश्वराने पुढे पाठविले आहे आणि ज्याच्या आज्ञा आपण सर्व पाळीत आहोत, तो सत्यतः परमेश्वरीय अवतार होय, याची तू साक्ष दे.

म्हणाः हे लोक हो, वैभवसंपन्न सर्व बुद्धिमान अवताराने ‘‘बयान’’ मध्ये जे ठरवून दिले आहे, त्या परमेश्वराच्या आदेशांचे तुम्ही पालन करा. तो निःसंशय दैवी दूतांचा सम्राट, आणि त्याचा ग्रंथ मातृ-ग्रंथ होय हे तुम्ही केवळ जाणले आहे.

याप्रमाणे ह्या बंदिवासातून दैवी कोकिळा त्याचीच हाक तुम्हासाठी प्रगट करते. त्यास केवळ हाच स्पष्ट संदेश द्यावयाचा आहे. जो कोणी वांच्छील त्याने ह्या उपदेशाकडे दुर्लक्ष करावे आणि जो कोणी वांच्छील, त्याने आपल्या प्रभु-मार्गाची निवड करावी.

हे लोक हो, तुम्ही ही दैवी वाणी नाकाराल तर कोणत्या प्रमाणाने तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवली आहे? हे मिथ्या लोकहो, आपले प्रमाण सादर करा. नव्हे, ज्या एकमेवाच्या हाती माझा आत्मा आहे, त्याची शपथ ते असे करण्यास समर्थ नाहीत आणि जरी ते एकमेकांस साह्य करण्यासाठी एकत्र आले, तरी कदापि समर्थ होणार नाहीत.

हे अहमद! मी उपस्थित नसेन तेव्हाही माझ्या कृपाप्रसादास विसरू नकोस. तुझ्या दिवसांमध्ये माझ्या दिवसांची आणि ह्या दूरस्थ बंदिवासातील माझ्या पीडा आणि हद्दपारीची आठवण ठेव. आणि शत्रुंच्या तलवारींनी तुझ्यावर हल्ल्यांचा वर्षाव केला आणि सर्व स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या विरूद्ध उभी ठाकली, तरी माझ्या प्रेमात तू इतका निश्चल रहा की तुझे अंतःकरण किंचितही विचलित होणार नाही.

तू माझ्या शत्रूंसाठी अग्नि-ज्वाला आणि माझ्या प्रियजनांसाठी चिरंतन जीवनाच्या नदीप्रमाणे हो आणि जे संशयी आहेत, त्यांच्यापैकी होऊ नकोस.

आणि माझ्या मार्गावर यातनांनी अथवा माझ्यासाठी अवमानांनी तुला ग्रासले तरी, त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस.

ईश्वरावर, तुझ्या परमेश्वरावर आणि तुझ्या पूर्वजांच्या स्वामीवर विश्वास ठेव. कारण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी ईश्वराला पाहून आणि त्याचे संगीत स्वतःच्या कानांनी ऐकून त्याला ओळखण्याच्या इच्छेअभावी लोक भ्रमाच्या मार्गावर भटकत आहेत. असे आम्हाला ते लोक आढळून आले आहेत, जसे तूही त्यास साक्षी आहेस.

ह्याप्रमाणे त्यांच्या अंधश्रद्धा ते स्वतः व त्यांची आपली अंतःकरणे यांच्यामध्ये आवरणे बनली आहेत आणि त्यांनी सर्वश्रेष्ठ व महान अशा परमेश्वराच्या मार्गापासून त्यांना वंचित ठेवले आहे.

निःसंशय जो ह्या दिव्य सौंदर्यापासून मुख वळवतो, तो भूतकाळातील दैवी दूतांपासूनही दुरावला आहे व तो अनादिकाळापासून अनंत काळापर्यंत परमेश्वराठायी अहंकार प्रदर्शित करीत आहे, ह्याबद्दल तुम्ही स्वतःची निःसंशय खात्री बाळगा.

हे अहमद, या पत्रिकेचे उत्तम अध्ययन कर. ती सुस्वराने म्हण आणि आपणा स्वतःस तिच्यापासून वंचित ठेवू नकोस. कारण, जो ही पत्रिका सुस्वर म्हणतो, त्यास शंभर हुतात्म्यांचे पारितोषिक आणि दोन्ही जगांतील सेवा ही निःसंशयपणे ईश्वराने नियोजित केली आहे. आमच्या वतीने एक कृपाप्रसाद आणि आमच्या सान्निध्यापासून दया म्हणून ही वरदाने आम्ही तुला प्रदान केली आहेत, ज्यायोगे अत्यंत कृतज्ञ लोकात तुझी गणना होवो.

परमेश्वराची शपथ! जो कोणी पीडाग्रस्त तथा दुःखी असेल, तो ही पत्रिका पुर्णतः निष्ठेने पठन करील, तर परमेश्वर त्याचे दुःख निवारण करील, त्याच्या अडचणी सोडवील आणि त्याच्या यातना दूर करील.

तो निःसंशय, दयाळू व कृपाळू आहे. सर्व जगांचा स्वामी अशा परमेश्वराचे स्तवन असो.

#12528
- Bahá'u'lláh