Return to BahaiPrayers.net
Facebook
(प्रतिदिन प्रातः, मध्यान्ह आणि सायंकाळी स्तवन करावी)
(जो कोणी प्रार्थना करू इच्छितो, त्याने हात धुवावेत आणि ते धुताना म्हणावे)
हे माझ्या परमेश्वरा, माझे हात बळकट कर ज्यायोगे ते तुझ्या पवित्र ग्रंथाला असे निर्धारपूर्वक पकडू शकतील की जगातील सैन्य दलाचे सामर्थ्यही त्यासमोर प्रभावहीन ठरेल. त्याचे जे नाही त्याच्या हस्तक्षेपापासून त्याचे संरक्षण कर; सत्यतः तू सर्व शक्तिमान व अतिसामर्थ्यशाली आहेस.
(आणि त्याने चेहरा धुतांना म्हणावे)
हे माझ्या स्वामी, मी माझे मुख तुझ्याकडे वळविले आहे. तुझ्या मुखमंडळाच्या प्रकाशाने त्याला उज्ज्वल कर. तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणाकडेही वळण्यापासून त्याचे रक्षण कर.
(नंतर त्याने उभे राहून किबलेहकडे [बाहजी, अक्का आराधनेचा बिंदु] उन्मुख होऊन म्हणावे)
परमेश्वर प्रमाणित करतो की त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणी परमेश्वर नाही. साक्षात्काराची आणि सृष्टीची राज्ये त्याचीच आहेत. सत्यतः त्याने जे साक्षात्काराचे उदयस्थान आहे, त्यास प्रगट केले आहे, ज्याने सिनाईवर सुसंवाद केला, ज्याच्याद्वारे सर्वोच्च क्षितीज प्रकाशित करण्यात आले आणि जो दैवी लोट-वृक्ष ज्यापलिकडे मार्ग नाही, तो बोलला आणि ज्याद्वारे स्वर्ग व पृथ्वीवरील सर्वांसाठी आवाहन घोषित करण्यात आले: “पहा सर्वधारक आला आहे. पृथ्वी आणि स्वर्ग, वैभव आणि साम्राज्य परमेश्वराचेच आहेत, जो सर्व मानवांचा स्वामी आणि आकाश व पृथ्वीतळावरील परमोच्च लोकांच्या सिंहासनाचा अधिष्ठाता आहे!”
(नंतर त्याने गुडघ्यावर हात टेकून ओणवे व्हावे आणि म्हणावे)
माझी स्तुति आणि माझ्या व्यतिरिक्त अन्य कुणाचीही स्तुति, माझे वर्णन आणि स्वर्ग व पृथ्वीवरील सर्वांच्या वर्णनांपेक्षा तू सर्वोच्च आहेस!
(नंतर उभे राहून आपल्या मुखासमोर तळहात उघडे करून म्हणावे)
हे माझ्या परमेश्वरा, त्याला निराश करू नकोस, ज्याने याचना करणाऱ्या बोटांनी तुझी दया आणि कृपा यांची किनार घट्ट पकडली आहे. जे दया दाखवतात, त्या सर्वांपेक्षा महादयानिधि तूच आहेस.
(नंतर त्याने बसावे व म्हणावे)
मी तुझे ऐक्य व तुझे एकत्व आणि तूच परमेश्वर आहेस आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य परमेश्वर नाही, ह्यास मी साक्ष आहे. सत्यतः तू तुझे धर्मकार्य प्रकट केले आहेस, तुझ्या करारनाम्याची पूर्तता केली आहेस आणि स्वर्ग व पृथ्वीवरील सर्व निवासियांसाठी तुझे कृपा द्वार सताड उघडे ठेवले आहेस. आशीर्वाद आणि शांती, अभिवादन आणि वैभव हे तुझ्या प्रियजनांना लाभो, ज्यांना जगातील परिवर्तने व अवसर यांनी तुझ्याकडे उन्मुख होण्यापासून परावृत्त केले नाही आणि ज्यांनी आपले सर्वस्व तुझ्यापाशी जे आहे ते मिळविण्याच्या आशेने अर्पण केले आहे. सत्यतः तू सदा क्षमाशील आणि सर्व कृपामय आहेस.
(कोणी दिर्घ पदाऐवजी हे शब्द म्हणेल तरी पुरेसे आहे: “परमेश्वर प्रमाणित करतो की त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणी संकटी सहाय्यक, स्वयंभू असा परमेश्वर नाही.” तसेच त्याने बसतांना जर हे शब्द निवडले तरी पुरेसे आहे: “मी तुझे ऐक्य आणि तुझे एकत्व आणि तूच परमेश्वर आहेस आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणी परमेश्वर नाही ह्यास मी साक्ष आहे.”)
- Bahá'u'lláh