Return to BahaiPrayers.net
Facebook
हे माझ्या परमेश्वरा आणि माझ्या स्वामी! मी तुझा सेवक व तुझ्या सेवकाचा पुत्र आहे. मी ह्या उष:काली माझ्या अंथरुणावरून उठलो आहे, जेव्हा तुझ्या आज्ञेच्या दिव्यग्रंथांत निर्धारित झाल्याप्रमाणे तुझ्या एकत्वाचा दिनमणी तुझ्या इच्छेच्या उदयस्थानावरून प्रकाशित झाला असून त्याचे तेज संपूर्ण विश्वावर पसरले आहे.
हे मम प्रभो, तुझे स्तवन असो की आम्ही तुझ्या ज्ञान प्रकाशाच्या तेजोवलयांसाठी जागे झालो आहोत. हे माझ्या स्वामी, आम्हास असे वरदान दे जे तुझ्या व्यतिरिक्त सर्वांपासून विलग ठेवील आणि तुझ्या व्यतिरिक्त सर्व आसक्तिपासून आम्हास मुक्त करील. तसेच माझ्यासाठी व माझे प्रियजन आप्तेष्ट, स्त्री व पुरुष यासर्वांसाठी सारखेच इहपरलोकीचे कल्याण अंकित कर. हे संपूर्ण निर्मितीच्या प्रियतमा आणि अखिल विश्वाच्या आकांक्षास्वरूपा, आम्हास तुझ्या सुनिश्चित संरक्षणाद्वारे त्यांच्यापासून सुरक्षित ठेव ज्यांना तू दुष्ट निंदकाची रूपे म्हणून बनविले व जे मानवांच्या हृदयात तुर्ककुतर्क करतात. तुला जे प्रिय आहे ते करण्यास तू समर्थ आहेस. सत्यत: तू सर्व शक्तिमान, संकटी सहाय्यक व स्वयंभू आहेस.
हे स्वामी माझ्या परमेश्वरा! तू ज्यांना आपल्या सर्वोत्तम पदव्या प्रदान केल्या आहेस आणि ज्याद्वारे तू सज्जन व दुर्जनांमध्ये अंतर केले आहेस त्यांना आशीर्वादित कर आणि तुला जे प्रिय आहे व तुला इच्छित आहे ते करण्यास आम्हास कृपाळूपणे सहाय्य कर. तसेच हे ममप्रभो, जे तुझे दिव्य शब्द व अक्षरे आहेत आणि ज्यांनी आपली मुखमंडळे तुझ्यावर केंद्रित केली आहेत आणि जे तुझ्याकडे उन्मुख झाले आहेत आणि तुझी हाक ज्यांनी ऐकली आहे त्यांना आशीर्वाद दे.
सत्यमेव तू सर्व मानवांचा स्वामी तथा सम्राट आणि सर्व सृष्टिचा नियंता आहेस.
- Bahá'u'lláh