Return to BahaiPrayers.net
Facebook
(परमेश्वराच्या सर्व मित्रांनी आपल्या कुवतीनुरूप योगदान केले पाहिजे, मग ते दान कितीही सामान्य का असेना. परमेश्वर एखाद्या आत्म्यावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भार टाकीत नाही. अशी योगदाने सर्व केंद्रांवर व सर्व भाविकांकडून आली पाहिजेत. हे परमेश्वराच्या मित्रांनो! या योगदानांच्या बदल्यात तुमची शेती, तुमचा उद्योग आणि तुमचा व्यवसाय उत्तम देणग्या व वरदाने याद्वारे अनेक पटीच्या वाढीने आशीर्वादित होईल याची तुम्ही खात्री बाळगा. जो कोणी एक सत्कृत्याने पुढे येतो त्याला दस पट पारितोषिक लाभेल. जे त्याच्या मार्गावर आपली संपत्ती खर्च करतात, त्यांना जीवित स्वामी विपुलता बहाल करील हे निःसंशय आहे.)
हे ईश्वरा! माझ्या परमेश्वरा! तुझ्या खऱ्या भक्तांचे भालप्रदेश उज्ज्वल कर आणि सुनिश्चित विजयाच्या देवदूत समूहांकरवी त्यांना आधार दे. तुझ्या सरळ मार्गावर त्यांचे पाय दृढ कर आणि तुझ्या सनातन कृपाप्रसादातून त्यांच्यासमोर तुझ्या अनुग्रहांची प्रांगणे उघड; कारण जे काही तू त्यांच्यावर प्रदान केले आहेस, त्याचा तुझ्या मार्गावर तुझ्या धर्माला सुरक्षित ठेवून, तुझ्या स्मरणावर आपला विश्वास ठेवून, तुझ्या प्रेमासाठी आपली अंतःकरणें अर्पित करून, तुझ्या सौंदर्याची आराधना आणि तुला प्रसन्न करण्याच्या मार्गांच्या शोधात आपल्या जवळ जे काही आहे ते राखून न ठेवता त्याचा विनियोग करीत आहेत.
हे माझ्या स्वामी! त्यांच्यासाठी विपुल भाग, निहित मोबदला आणि निश्चित पारितोषिक निर्धारित कर.
सत्यत: तूच एकमेव पोषणकर्ता, सहाय्यक, उदार, कृपामय व सदैव वरदाता आहेस.
- `Abdu'l-Bahá