Return   Facebook   Zip File

Arabic

1

हे चैतन्य पुत्रा!

माझा आद्य उपदेश हा आहे: एक पवित्र दयाळू आणि तेजस्वी हृदय धारण कर, ज्यायोगे तू अनादि अनंत आणि अनंत सत्तेचा धारक व्हावे.

2

हे चैतन्य पुत्रा!

न्याय माझ्या दृष्टीमध्ये सर्व गोष्टींपेक्षा अतिप्रिय आहे. तू मला इच्छितोस तर त्यापासून दुरावू नकोस, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. याच्या सहाय्याने तू इतरांच्या नेत्रांनी नव्हे तर स्वत:च्या नेत्राने पाहशील आणि तुझ्या शेजाऱ्याच्या ज्ञानाने नव्हे तर आपल्या स्वतःच्या ज्ञानाने जाणशील. तू कसा असला पाहिजे यावर तू तुझ्या अंत:करणात विचार कर. सत्यतः न्याय तुझ्यासाठी माझी देणगी आहे आणि माझ्या प्रेमपूर्ण दयेचे चिन्ह आहे. हे तू तुझ्या नेत्रासमोर ठेव.

3

हे मानव पुत्रा!

माझ्या अनादि अस्तित्वात आणि माझ्या सारतत्त्वाच्या पुरातन अनंतात झाकलेले तुझ्यावरील माझे प्रेम मी जाणले; यासाठी मी तुला निर्मिले, तुझ्यावर माझी प्रतिमा कोरली आणि माझ्या सौंदर्याचे दर्शन तुला घडविले.

4

हे मानव पुत्रा!

तुझी निर्मिती मला प्रिय होती, यास्तव मी तुला निर्मिले. तसेच तू देखील मजवर प्रेम कर, जेणेकरून मी तुझ्या नामाचा नामोच्चार करावा आणि तुझा आत्मा जीवनाच्या चैतन्याने भारून टाकावा.

5

हे अस्तित्व पुत्रा!

माझ्यावर प्रेम कर, ज्यायोगे मी तुझ्यावर प्रेम करावे. तू माझ्यावर प्रेम करणार नाहीस तर माझेही प्रेम तुझ्यापर्यंत कदापि पोहचू शकणार नाही. सेवका, हे जाण.

6

हे अस्तित्व पुत्रा!

माझे प्रेम हेच तुझे नंदनवन; माझ्याशी पुनर्मिलन, हेच तुझे स्वर्गीय निवासस्थान. त्यात प्रवेश कर आणि विलंब करू नकोस. हेच ते आहे जे तुझ्यासाठी आम्ही आमच्या उच्च राज्यात, आमच्या गौरवशाली साम्राज्यात निहित केले आहे.

7

हे मानव पुत्रा!

तू माझ्यावर प्रेम करतोस तर तुझ्या स्वतःपासून विमुख हो; आणि माझ्या प्रसन्नतेसाठी तू प्रयत्न करतोस तर स्वतःकडे लक्ष देऊ नकोस; जेणेकरून तू माझ्या ठायी विलीन व्हावे आणि मी तुझ्याठायी अमरत्वाने वास करावा.

8

हे चैतन्य पुत्रा!

तुझ्या स्वतःचा परित्याग केल्याशिवाय आणि माझ्याकडे उन्मुख झाल्याशिवाय तुला शांती नाही; कारण तुझ्या स्वतःच्या नावात नव्हे तर माझ्या नामात गौरव मानणे तुला निर्धारित आहे, किंबहुना स्वतःवर नव्हे तर माझ्यावर विश्वास ठेवणे तुझ्यासाठी योग्य आहे. तसेच चराचरात जे सर्व काही आहे, त्यात केवळ माझीच भक्ती व्हावी असे मी इच्छितो.

9

हे अस्तित्व पुत्रा!

माझे प्रेम हा माझा बालेकिल्ला आहे. त्यात जो प्रवेश करतो तो सुरक्षित व संरक्षित आहे आणि जो विमुख होतो तो निश्चितपणे भटकत राहील व नाश पावेल.

10

हे उद्घोषाच्या पुत्रा!

तू माझा बालेकिल्ला आहेस. त्यात प्रवेश कर, म्हणजे तू सुरक्षितपणे निवास करशील. माझे प्रेम तुझ्याठायी आहे, त्यास जाण, त्यायोगे तू मला तुझ्या सन्निध पहाशील.

11

हे अस्तित्व पुत्रा!

तू माझा दीपक आहेस, आणि माझा दिव्य प्रकाश तुझ्याठायी आहे. माझ्या दिव्य प्रकाशाने तू प्रकाशित हो आणि माझ्याशिवाय अन्य कोणासही शोधू नकोस. कारण मी तुला संपन्न निर्माण केले आहे आणि माझ्या सर्व कृपा तुला औदार्याने प्रदान केल्या आहेत.

12

हे अस्तित्व पुत्रा!

मी तुला दिव्य सामर्थ्याच्या हातांनी घडविले व महान शक्तीच्या बोटांनी तुला निर्मिले आणि तुझ्याठायी माझ्या प्रकाशाचे सत्व प्रस्थापित केले. त्यातच तू संतुष्ट हो, आणि इतर कशालाही शोधू नकोस. कारण माझे कार्य परिपूर्ण असून माझा आदेश बंधनकारक आहे. त्याबद्दल वाद घालू नकोस किंवा त्याविषयी शंका बाळगू नकोस.

13

हे चैतन्य पुत्रा!

मी तुला धनवान निर्मिले असताही तू स्वतःवर दारिद्र्य का ओढवून घेतोस? मी तुला प्रतिष्ठित केले असूनही तू स्वतःस हीन का करतोस? ज्ञानाच्या सारतत्त्वातून मी तुला अस्तित्व दिले असताही माझ्याशिवाय इतरांकडून तू ज्ञान प्रकाश का शोधतोस? मी तुला प्रेमाच्या मातीतून आकार दिला तरी तू इतरांबरोबर स्वतःस कसे गुंतवून घेतोस? तू अंतर्मुख हो ज्यायोगे सामर्थ्यशाली, शक्तिशाली आणि स्वयंभू म्हणून तू मला आपल्या अंतर्यामी पहावेस.

14

हे मानव पुत्रा!

तुझ्याठायी माझे अधिपत्य आहे आणि माझे अधिपत्य कधीच नष्ट होत नाही, मग तुझा नाश होण्याची तुला भीती का? तू माझा प्रकाश आहेस आणि माझा प्रकाश कधीच मालवत नाही, मग तुला विझण्याची भिती का? तू माझे वैभव आहेस आणि माझे वैभव निस्तेज होत नाही. तू माझा झगा आहेस आणि तो कधीच जीर्ण होत नाही. तेव्हा तू माझ्या प्राप्तीच्या प्रेमात निवास कर, ज्यायोगे वैभवाच्या अधिराज्यात तू मला पहावेस.

15

हे उद्घोषाच्या पुत्रा!

माझ्याकडे तुझे मुख वळव आणि माझ्या व्यतिरिक्त सर्वांचा परित्याग कर, कारण माझे सार्वभौमत्व अविनाशी आहे व माझे अधिपत्य नाश पावत नाही. माझ्याशिवाय दुसऱ्याची अभिलाषा ठेवून तू साऱ्या विश्वाच्या शोधात कल्पान्त भटकलास तरी तुझा शोध व्यर्थ होईल.

16

हे प्रकाश पुत्रा!

माझ्याशिवाय सारे विसर आणि केवळ माझ्या चैतन्याशी सुसंवाद कर. हेच माझ्या आज्ञेचे सार आहे, म्हणून तिला शिरसावंद्य मान.

17

हे मानव पुत्रा!

तू माझ्यात संतुष्ट रहा आणि इतर सहाय्यकर्त्याचा शोध करू नकोस. कारण माझ्याशिवाय तुझा पोषणकर्ता अन्य कोणी असू शकत नाही.

18

हे चैतन्य पुत्रा!

तुझ्यासाठी आम्ही जे इच्छित नाही ते आमच्याकडे मागू नकोस, तर तुझ्यासाठी आम्ही जे काही निश्चित केले आहे त्यातच संतुष्ट रहा, कारण त्याने तू जर समाधानी होशील, तर त्यात तुझे हित असेल.

19

हे अलौकिक अंतर्द्रृष्टीच्या पुत्रा!

प्रत्यक्ष माझ्या चैतन्याचा श्वास मी तुझ्यात फुंकला आहे ज्यायोगे तू माझा प्रियकर व्हावेस. मग का बरे तू मला सोडून दिलेस व माझ्याशिवाय दुसऱ्यास आपले प्रेममात्र बनविले आहेस?

20

हे चैतन्य पुत्रा!

तुझ्यावर माझा महान हक्क आहे, तो विसरता येऊ शकत नाही. तुजवर माझी विपुल कृपा आहे, ती लपवून ठेवता येऊ शकत नाही. माझ्या प्रेमाने तुझ्याठायी आपले निवासस्थान केले आहे, ते गुप्त ठेवता येऊ शकत नाही. माझा प्रकाश तुझ्यावर प्रगटला आहे, त्याला दिसेनासा करता येऊ शकत नाही.

21

हे मानव पुत्रा!

मी तुझ्यासाठी तेजस्वी वैभवाच्या वृक्षावर अति निवडक फळे लावून ठेवली आहेत, मग तू त्यांपासून विमुख का झालास आणि जे कमी चांगले आहे त्यात स्वतःला का समाधानी केले आहेस? तेव्हा उच्चस्थानी जे अधिक चांगले आहे त्याकडे परत ये.

22

हे चैतन्य पुत्रा!

मी तुला प्रतिष्ठित निर्मिले आहे तरी तू स्वतःस हीन बनविले आहेस. तेव्हा ज्यासाठी तुला निर्माण केले त्याकडे उद्युक्त हो.

23

हे उच्चत्वाच्या पुत्रा!

मी तुला अमरत्वाकडे पाचारण करतो तथापि जे नश्वर आहे, त्याचा तू शोध घेतोस. आमची अभिलाषा सोडून तू स्वतःच्या आकांक्षा शोधण्यासाठी कशामुळे बाध्य झालास?

24

हे मानव पुत्रा!

तुझ्या मर्यादांचे उल्लंघन करू नकोस किंवा तुझ्यासाठी अनुचित गोष्टींची अपेक्षा करू नकोस. सर्व शक्तिमान व सामर्थ्यशाली परमेश्वराच्या मुखकमलासमोर दंडवत घाल.

25

हे चैतन्य पुत्रा!

दुबळ्यांसमोर बढाई मारू नकोस, कारण त्यांच्या मार्गावर मी त्यांचे नेतृत्व करीत असतो आणि तुझ्या अनिष्ट दुरावस्थेत मी तुला पाहतो आणि त्यातच तुला कायमचा गोंधळात ठेवतो.

26

हे अस्तित्व पुत्रा!

तू स्वतःचे दोष विसरून इतरांच्या दोषांमध्ये स्वतःला कसा गुंतवून ठेवू शकतोस? जो कोणी असे करतो तो माझ्याकडून शापित आहे!

27

हे मानव पुत्रा!

तू स्वतः पापी आहेस तोपर्यंत इतरांच्या पापांचा उच्चार देखील करू नकोस. ही आज्ञा तू उल्लंघिलीस तर शापित होशील आणि यास मी साक्ष आहे.

28

हे चैतन्य पुत्रा!

तू हे सत्य जाण, जो दुसऱ्यांना न्यायीपणाचा उपदेश करतो, परंतु स्वतः अन्यायाने वागतो, तो माझ्या नामाशी संबंधित असला तरी माझा नाही.

29

हे अस्तित्व पुत्रा!

तू स्वतःशी लावून घेणार नाहीस ते कोणत्याही आत्म्याच्या बाबतीत लावू नकोस आणि तू जे करीत नाहीस ते सांगू नकोस. ही तुझ्यासाठी माझी आज्ञा आहे. तिचे तू पालन कर.

30

हे मानव पुत्रा!

माझ्या सेवकाने तुझ्याकडे कशाचीही मागणी केल्यास त्याला नकार देऊ नकोस; कारण त्याचे रूप हे माझे रूप आहे. यास्तव माझा मान ठेव.

31

हे अस्तित्व पुत्रा!

तू दररोज आपल्या कर्मांची तपासणी कर, कारण तुला केव्हाही जाब देण्यासाठी बोलावण्यात येईल. जेव्हा मरण येईल ते तुला पूर्व-सूचना न देता येईल आणि तुला आपल्या कृत्यांचा हिशेब द्यावा लागेल.

32

हे उच्चत्वाच्या पुत्रा!

मी तुझ्यासाठी मृत्युला आनंददूत बनविले आहे. मग तू दुःख का करतोस? प्रकाशाला त्याचे तेज तुझ्यावर पसरविण्यासाठी मी बनविले. मग तू त्याच्यापासून स्वतःला का लपवून ठेवतोस?

33

हे चैतन्य पुत्रा!

प्रकाशाच्या आनंददायी सुवार्तेने मी तुझे स्वागत करतो: तू प्रमोदित हो! पावित्र्याच्या दरबाराकडे मी तुला बोलावतो, तेथे वास्तव्य कर ज्यायोगे तू चिरकाल शांतीत रहावेस.

34

हे चैतन्य पुत्रा!

पावन चैतन्य तुला पुनर्मिलनाची सुवार्ता देते मग तू दुःखी का बरे? सामर्थ्यशाली चैतन्य तुला त्याच्या धर्मकार्यात निश्चित करते, मग तू त्यापासून स्वतःला लपवून का ठेवतोस? त्याच्या मुखमंडळाचा प्रकाश तुझे मार्गदर्शन करीत आहे, मग तू पथभ्रष्ट कसा होऊ शकतोस?

35

हे मानव पुत्रा!

आमच्यापासून अंतरण्यात खेद मानण्याशिवाय इतर कशात खेद मानू नकोस. आमच्याकडे जवळ व परत येण्यात आनंद मानण्याशिवाय इतर कशानेही हर्षित होऊ नकोस.

36

हे मानव पुत्रा!

तुझ्या हृदयातील आनंदाने तू हर्षित हो म्हणजे माझ्या मिलनास आणि माझे सौंदर्य परावर्तित करण्यास तू सुपात्र होशील.

37

हे मानव पुत्रा!

माझ्या सुंदर वस्त्रालंकारापासून अलिप्त राहू नकोस आणि माझ्या अलौकिक झऱ्यातून तुला मिळालेल्या वाट्यापासून वंचित राहू नकोस, नाहीतर तू सदैव तृषार्त राहशील.

38

हे अस्तित्व पुत्रा!

माझ्या प्रेमासाठी माझ्या नियमांचे पालन कर आणि माझी प्रसन्नता तुला मिळवायची असेल तर तू ज्याची आकांक्षा करतोस त्याचा नकार कर.

39

हे मानव पुत्रा!

माझ्या सौंदर्याचा प्रेमी असशील तर तू माझ्या आदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस आणि मला प्रसन्न करावयाचे असेल तर माझे उपदेश विसरू नकोस.

40

हे मानव पुत्रा!

अंतराळाच्या असीमतेमधून तू वेगाने गेलास आणि स्वर्गाचा विस्तार ओलांडलास तरी आमच्या आदेशापुढे शरणागती आणि आमच्या मुखारविंदासमोर विनम्रता याशिवाय तुला शांती मिळणार नाही.

41

हे मानव पुत्रा!

माझ्या धर्मकार्याची वृद्धी कर म्हणजे माझ्या थोरपणाची रहस्ये मी तुझ्यावर प्रकट करीन आणि अनंतत्वाच्या प्रकाशाने तुझ्यावर चमकेन.

42

हे मानव पुत्रा!

मी तुला भेट देण्याची कृपा करावी म्हणून तू माझ्यासमोर विनम्र हो. माझ्या धर्मकार्याच्या विजयाकरिता तू उद्युक्त हो म्हणजे पृथ्वीवर असतांनाच तुला विजय मिळविता येईल.

43

हे अस्तित्व पुत्रा!

माझ्या पृथ्वीवर माझे स्तवन कर म्हणजे माझ्या स्वर्गात मी तुझी आठवण करीन आणि याप्रमाणे तुझ्या व माझ्या नेत्रांना सांत्वन मिळेल.

44

हे दिव्य सिंहासनाच्या पुत्रा!

तुझे श्रवण ते माझे श्रवण, त्याने तू श्रवण कर. तुझी दृष्टी ती माझी दृष्टी, तू त्याने अवलोकन कर, ज्यायोगे तू आपल्या अतीव अंतर्यामी माझ्या सर्वोच्च पावित्र्यास प्रमाणित करशील आणि मी माझ्या अंतःस्वरुपात तुझ्यासाठी सर्वोच्च पदाची साक्ष बनेन.

45

हे अस्तित्व पुत्रा!

माझ्या मार्गावर हौतात्म्याची अभिलाषा कर, माझ्या अनुग्रहात समाधानी हो आणि मी जे नियोजित करतो त्यासाठी कृतज्ञ हो; ज्यायोगे वैभवाच्या सावलीत दिव्य तेजाच्या मंडपाखाली तू माझ्या सन्निध विसावा घ्यावा.

46

हे मानव पुत्रा!

मनन व चिंतन कर. काय आपल्या अंथरूणावर मरावे किंवा माझ्या पवित्र धर्ममार्गावर हुतात्मा होऊन आपले जीवनरक्त धुळीवर सांडावे आणि माझ्या आदेशाचे द्योतक व सर्वोच्च नंदनवनात माझ्या प्रकाशाचे आविष्कारक बनावे अशी तुझी इच्छा आहे? हे सेवका! तू योग्य तो निर्णय घे.

47

हे मानव पुत्रा!

माझ्या सौंदर्याची शपथ! तुझ्या केसांना तुझ्या रक्ताने माखविणे माझ्या दृष्टीने विश्वनिर्मिती व उभय जगांच्या प्रकाशापेक्षा अधिक श्रेष्ठकर्म आहे. तेव्हा हे सेवका! अशी परमगती साध्य करण्याची पराकाष्ठा कर.

48

हे मानव पुत्रा!

प्रत्येक गोष्टीसाठी एक चिन्ह असते. प्रेमाचे चिन्ह म्हणजे माझ्या आज्ञा पाळताना धैर्य आणि माझ्या कसोट्यांत सहनशीलता बाळगणे होय.

49

हे मानव पुत्रा!

खरा प्रेमी संकटाची अभिलाषा करतो, ज्याप्रमाणे क्षमेसाठी विद्रोही आणि दयेसाठी पापी याचना करतो.

50

हे मानव पुत्रा!

माझ्या मार्गात तुझ्यावर जर संकट येत नसेल तर तू माझ्या प्रसन्नतेत समाधान मानणाऱ्यांच्या मार्गावर कसा चालू शकशील? माझ्याशी मिलनाची उत्कट याचना करतांना परीक्षेस सामोरे जावे लागले नाही, तर माझ्या सौंदर्यासाठीच्या तुझ्या प्रेमात तुला प्रकाश कसा लाभेल?

51

हे मानव पुत्रा!

माझ्याकडून येणारे संकट माझा कृपाप्रसाद आहे, बाह्यतः ते अग्नी व सूड यांसारखे आहे पण अंतर्यामी ते प्रकाश व दया आहे. म्हणून त्याचे सहर्ष स्वागत कर म्हणजे तू शाश्वत तेज आणि अमर चैतन्य बनशील. ही माझी तुझ्यासाठी आज्ञा आहे, तिचे तू पालन कर.

52

हे मानव पुत्रा!

जर तुला समृद्धी प्राप्त होईल तर हर्षित होऊ नकोस आणि जर तुझ्यावर मानहानी येईल, तेव्हा दुःखी होऊ नकोस, कारण दोन्ही अवस्था निघून जातील आणि त्यापैकी कोणतीच राहणार नाही.

53

हे अस्तित्व पुत्रा!

तुला दारिद्र्याने ग्रासले तरी दुःखी होऊ नकोस; कारण यथावकाश सर्व ऐश्वर्याचा परमस्वामी तुला भेट देईल. मानहानीची चिंता करू नकोस, कारण एके दिनी तुला सन्मान लाभेल.

54

हे अस्तित्व पुत्रा!

तू अमर व अविनाशी राज्याची आणि ह्या सनातन, चिरंतन जीवनाची आशा करीत असशील तर या नश्वर व क्षणभंगुर सार्वभौमत्वाचा त्याग कर.

55

हे अस्तित्व पुत्रा!

या जगात स्वतःला गुरफटून घेऊ नकोस, कारण आम्ही अग्नीने सुवर्णाची व सुवर्णाने आमच्या सेवकांची परीक्षा घेतो.

56

हे मानव पुत्रा!

तुला सुवर्णाची लालसा असेल तर मी त्यापासून तुझी मुक्ती इच्छितो. तू त्याच्या प्राप्तीने स्वतःस धनवान समजतोस तर मी त्यापासून तुझ्या विरक्तीत तुझी श्रीमंती समजतो. माझ्या जीवनाची शपथ! हे माझे दिव्य ज्ञान आहे व तो तुझा केवळ भ्रम आहे; मग माझा मार्ग तुझ्याशी कसा जुळावा?

57

हे मानव पुत्रा!

तू माझी संपत्ती माझ्या गरीबांवर अर्पण कर, ज्यायोगे स्वर्गात तुला न मंदावणाऱ्या तेजाची भंडारे व अविनाशी वैभवाची कोषागारे लाभतील. माझ्या जीवनाची शपथ! तू जर माझ्या दृष्टीने पाहू शकलास तर तुला दिसेल की तुझे आत्मसमर्पण अधिक वैभवशाली आहे.

58

हे मानव पुत्रा!

अस्तित्वाचे मंदिर माझे सिंहासन आहे, ते इतर सर्व गोष्टींपासून स्वच्छ ठेव, ज्यायोगे मी तेथे स्थानापन्न होऊन तेथेच वास करू शकेन.

59

हे अस्तित्व पुत्रा!

तुझे हृदय माझे घर आहे; माझ्या अवतरण्यासाठी ते पवित्र कर. तुझे चैतन्य माझ्या साक्षात्काराचे स्थान आहे; माझ्या प्रकटनासाठी ते शुद्ध कर.

60

हे मानव पुत्रा!

माझ्या वक्ष:स्थळावर तुझा हात ठेव, म्हणजे दिव्यता व तेज यांसह मी तुझ्यावर उदयमान होईन.

61

हे मानव पुत्रा!

माझ्या स्वर्गाकडे आरोहण कर, जेणेकरून तू पुनर्मिलनाच्या परमानंदाचा लाभ घ्यावा आणि चिरंतन वैभवाच्या महा-चषकातून अतुल्य अमृताचे मनसोक्त प्राशन करावे.

62

हे मानव पुत्रा!

तुझ्या निरर्थक कल्पनात व व्यर्थ भ्रमात तू स्वतःस दिवसेंदिवस किती गुरफटून घेतले आहेस, तू आपल्या शय्येवर किती वेळ झोपणार? उठ आणि गाढ निद्रेतून जागा हो, कारण दिव्य सूर्य क्षितिजावर उदयमान झाला आहे, कदाचित त्याच्या सौंदर्य प्रकाशाने तू पण उजळून निघशील.

63

हे मानव पुत्रा!

पवित्र पर्वताच्या क्षितीजावरील प्रकाश तुझ्यावर चमकला आहे आणि तुझ्या हृदयाच्या दैवी सिंहासनामध्ये आत्मज्ञानाच्या चैतन्याने श्वास घेतला आहे. म्हणून तू मिथ्या भ्रमजालातून स्वतःस मुक्त कर आणि माझ्या दरबारात प्रवेश कर, ज्यायोगे तू चिरंतन जीवनाचा सहभागी होण्यास आणि माझ्या मिलनास पात्र ठरशील. अशा प्रकारे तुला न मरण, न थकवा किंवा न विपत्ती गाठेल.

64

हे मानव पुत्रा!

माझे अनंत्व मीच निर्मिले आहे आणि ते तुझ्यासाठी निर्मिले आहे. त्याचे वस्त्र तू परिधान कर. माझे ऐक्य माझे हस्तकौशल्य आहे आणि ते तुझ्यासाठी मी घडविले आहे. त्याने तू स्वतःस भूषव, ज्यायोगे तू सर्व अनंतासाठी माझ्या शाश्वत अस्तित्वाचा साक्षात्कार बनशील.

65

हे मानव पुत्रा!

माझी भव्यता तुझ्यासाठी माझी देणगी आणि माझी वैभवसंपन्नता तुझ्यासाठी माझ्या दयेचे चिन्ह आहे. मला जे योग्य दिसते, त्याचे कोणालाच आकलन होणार नाही किंवा कोणीही त्याचे वर्णन करू शकणार नाही. खरोखर माझ्या भक्तासाठी प्रेमपूर्ण दयाळूपणा आणि माझ्या लोकासाठी माझी करुणा याचे चिन्ह म्हणून ते रहस्य मी माझ्या गुप्त भांडारामध्ये आणि माझ्या आज्ञेच्या खजिन्यांमध्ये जतन करून ठेवले आहे.

66

हे दैवी व अदृश्य सारतत्त्वाच्या बालकांनो!

माझ्यावर प्रेम करतांना तुम्हास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल आणि आत्मे माझा नामोल्लेख करतांना प्रक्षुब्ध होतील. कारण मानव-मन माझे आकलन करू शकत नाहीत आणि हृदये मला सामावू शकत नाहीत.

67

हे सौंदर्य पुत्रा!

माझे चैतन्य व कृपेची शपथ! माझी दया व सौंदर्याची साक्ष! माझ्या अधिकारवाणीने मी तुझ्यासाठी जे काही प्रकट केले आहे व शक्तीच्या लेखणीने तुझ्यासाठी जे काही लीपिबद्ध केले आहे ते सर्व माझी अवस्था व दिव्य ध्वनीच्या अनुपम संगीतानुसार नसून ते सर्व तुझ्या पात्रतेस व ग्रहण शक्तीस झेपेल असेच आहे.

68

हे मानव पुत्रांनो!

तुम्ही जाणत नाही की तुम्हा सर्वांना आम्ही एकाच मातीतून का निर्माण केले? कारण कोणीही स्वतःस दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजू नये. तुमची निर्मिती कशी झाली यावर तुम्ही तुमच्या अंतःकरणात सदोदीत विचार करा. ज्याअर्थी तुम्हा सर्वांना आम्ही एकमेव तत्त्वापासून निर्माण केले आहे त्याअर्थी तुमचे कर्तव्य आहे की, तुम्ही एकाच भूमीवर निवास करावा, ज्यायोगे तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, तुमची कृत्ये व कार्ये यांचेद्वारे एकतेची चिन्हे व अनासक्तीचे सार व्यक्त व्हावेत. असा माझा तुम्हाला उपदेश आहे, हे ज्योतीसमूहा! त्याचे पालन करा, ज्यायोगे अद्भुत वैभवाच्या वृक्षापासून पावित्र्याची फळे तुम्हास लाभावीत.

69

हे चैतन्य पुत्रांनो!

तुम्ही माझे खजिने आहात, कारण माझ्या रहस्यांची मौक्तिके आणि माझ्या ज्ञानाचे रत्नमणी तुमच्याठायी मी दडवून ठेवले आहेत. माझ्या सेवकांमध्ये अपरिचितापासून आणि माझ्या लोकांमध्ये दृष्टांपासून त्यांचे संरक्षण करा.

70

आपल्या आत्म्याच्या राज्यात स्वयंभू असणाऱ्याच्या पुत्रा!

तू हे जाण की, मी तुझ्यासाठी पावित्र्याचा सुमधुर सुगंध दरवळलेला आहे, माझी दिव्य वाणी तुला पूर्णतः प्रगट केली आहे, माझी कृपा पूर्णरूपाने तुला बहाल केली आहे आणि मी स्वतःसाठी जे इच्छिले आहे, तेच तुझ्यासाठी इच्छिले आहे. म्हणून माझ्या प्रसन्नतेत समाधानी व माझ्यासाठी कृतज्ञ हो.

71

हे मानव पुत्रा!

आम्ही तुझ्यासाठी जे प्रगट केले आहे ते सर्व तू प्रकाशाच्या शाईने तुझ्या चैतन्याच्या पत्रिकेवर बिंबव. हे जर तुझ्या आवाक्यात नसेल तर तुझ्या हृदयात जे सार आहे त्याची शाई कर. हे देखील तुला शक्य नसेल तर माझ्या मार्गावर सांडण्यात आलेल्या रक्ताच्या शाईने तू लिही. इतर सर्वांपेक्षा मला हे खरोखर अधिक प्रिय आहे, ज्यायोगे त्याचा प्रकाश अजरामर राहील.

Persian

1

सर्व शक्तिमान उद्घोषाच्या परमस्वामीच्या नामाने!

ज्यांचे जवळ जाणण्यासाठी बुद्धी आणि श्रवण करण्यासाठी कर्ण आहेत असे जन हो!

आपल्या प्रियतमाचा हा प्रथम उपदेश आहे: हे रहस्यमय कोकिळे! चैतन्याच्या गुलाब बागेशिवाय इतरत्र वास करू नकोस. हे प्रेम सोलोमनच्या राजदूता! प्राणेश्वराच्या शीबाशिवाय इतरत्र आश्रयस्थान शोधू नकोस आणि हे अमर फिनिक्स पक्षा! अढळ श्रद्धेच्या पर्वत शिखराशिवाय दुसरीकडे वास करू नकोस. तू आपल्या आत्म्याच्या पंखांनी अनंताच्या राज्याकडे उड्डाण करशील आणि तुझे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करशील तर तेथेच तुझे निवासस्थान आहे.

2

हे चैतन्य पुत्रा!

पक्षाला आपले घरटे व कोकीळेस गुलाबाचे सौंदर्य प्रिय आहे; परंतु मानवी हृदयांचे पक्षी क्षणभंगुर धुळीमध्ये समाधानी झाले व त्यांच्या चिरकालिक घरट्यापासून वाट चुकून भटकत राहिले आहेत आणि बेपर्वाईच्या खाईकडे दृष्टी वेधल्याने ईश्वरी सान्निध्याच्या वैभवापासून वंचित झाले आहेत. अरेरे! किती विचित्र आणि दयनीय आहेत ते; केवळ एका कपभर पाण्यासाठी त्यांनी सर्वश्रेष्ठाच्या कृपामय सागराचा अव्हेर केला आहे व दिव्य क्षितिजापासून ते अंतरले आहेत.

3

हे मित्रा!

तुझ्या हृदयाच्या बागेत प्रेमाच्या गुलाबाशिवाय दुसरे काही रुजवू नकोस आणि उदात्त प्रेम व सदिच्छेच्या कोकीळ पक्ष्यावरील तुझे नियंत्रण सैल करू नकोस. सत्पुरुषांची संगत बहुमोल समज आणि ईश्वरापासून विमुख झालेल्या लोकांची मैत्री पूर्णपणे वर्ज्य कर.

4

हे न्यायाच्या पुत्रा!

प्रेमी त्याच्या प्रियतमाच्या भूमिव्यतिरिक्त अन्यत्र कोठे जाऊ शकतो? कोणत्या जिज्ञासुला त्याच्या हृदयाकांक्षेपासून दूर विसावा लाभतो? खऱ्या प्रेमीसाठी पुनर्मिलन हे जीवन आणि वियोग मृत्यु असतो. त्याचे मन बेचैन व हृदय अशांत असते. त्याच्या प्रियतमाच्या निवासाकडे त्वरा करण्यासाठी तो असंख्य जीवनांचा परित्याग करेल.

5

हे धुली पुत्रा!

सत्यतः मी तुला सांगतो की वृथावाद करणारा आणि आपल्या बंधुपेक्षा स्वतःची फार महानता मिरविणारा मनुष्य हा सर्वांपैकी अत्यंत क्षुद्र मनोवृत्तीचा आहे. बंधूंनो! म्हणा, शब्द नव्हे तर कृती तुझे आभूषण असू दे.

6

हे मृत्तिका पुत्रा!

हे खरोखर जाण की, ज्या मनुष्याच्या हृदयास मत्सराचा एक अंश देखील असेल तर तो माझी शाश्वत सत्ता कधीच प्राप्त करू शकणार नाही किंवा त्याच्याप्रत पावित्र्याच्या माझ्या राज्यापासून तरंगणारा मधुर परिमल कधीच पोहचू शकणार नाही.

7

हे प्रेमाच्या पुत्रा!

तू वैभवशाली नभोमंडळाच्या उच्चत्वापासून आणि प्रेमाच्या स्वर्गीय वृक्षापासून केवळ एकच पाऊल दूर आहेस. तू एक पाऊल उचल आणि दुसऱ्या पावलातच तू अमर साम्राज्याकडे प्रगती करून अमरलोकीच्या दरबारात प्रवेश कर. तेव्हा सर्वोच्च वैभवाच्या लेखणीतून जे प्रकट झाले आहे ते तू श्रवण कर.

8

हे वैभव पुत्रा!

पावित्र्याच्या मार्गावर तू त्वरा कर आणि माझ्याशी एकरूपतेच्या स्वर्गात प्रवेश कर. चैतन्याच्या चकाकीने तुझे हृदय स्वच्छ कर आणि सर्वश्रेष्ठाच्या दरबाराकडे त्वरा कर.

9

हे क्षणभंगुर छाया!

संशयाच्या हीन पातळ्यांना ओलांडून निश्चिततेच्या उच्च शिखरांकडे उन्नत हो. सत्याचा नेत्र उघड म्हणजे तुला पवित्र सौंदर्याचे दर्शन घडेल आणि तू उद्गारशील: हे परमस्वामी! तू सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम निर्माता आहेस. तुझा जयजयकार असो!

10

हे आकांक्षा पुत्रा!

तू हे लक्ष देऊन ऐक: अमर सौंदर्याचे आकलन नाशवंत नेत्रांने कधीच होणार नाही व विषयांच्या शुष्क बहाराशिवाय निर्जीव हृदय दुसऱ्या कशात आनंदी होणार नाही. कारण समान गुणधर्मी नेहमी एकत्र येतात आणि त्यांच्या सारख्याच्या सहवासात आनंद मानतात.

11

हे धुली पुत्रा!

तुझे नेत्र बंद कर म्हणजे तू माझे सौंदर्य पाहू शकशील; तुझे कर्ण बंद कर म्हणजे माझ्या वाणीची मधुरता तू श्रवण करू शकशील; स्वतःला सर्व विद्यांपासून रिक्त कर म्हणजे माझ्या ज्ञानातील वाटा तू मिळवू शकशील आणि स्वतःस संपत्तीपासून शुद्ध कर म्हणजे माझ्या शाश्वत संपत्तीच्या महासागरातून चिरंतन वाटा तू प्राप्त करू शकशील. माझ्या सौंदर्याव्यतिरिक्त अन्य सर्वांपासून तुझे नेत्र बंद कर; माझ्या वचनाव्यतिरिक्त अन्य सर्वांसाठी तुझे कर्ण बंद कर; माझ्या ज्ञानाव्यतिरिक्त अन्य सर्व विद्यांपासून स्वतःला रिक्त कर; जेणेकरून सुस्पष्ट अंतर्दृष्टीने, पवित्र हृदयाने आणि लक्षपूर्वक कर्णाने तू माझ्या पावित्र्याच्या दरबारात प्रवेश करू शकशील.

12

हे द्वैत दृष्टीच्या मनुष्या!

बाह्यदृष्टी बंद करून अंतर्दृष्टी उघड. विश्वासाठी आणि त्यातील सर्वांसाठी बाह्यदृष्टी बंद कर आणि अंतर्दृष्टीने प्राणेश्वराच्या पवित्र सौंदर्याचे दर्शन कर.

13

हे माझ्या बालकांनो!

स्वर्ग–कोकिळेच्या मधुर संगीताच्या आस्वादाशिवाय तुम्ही शून्याच्या पाताळात कोठे गर्क व्हाल आणि गुलाब पुष्पाच्या सौंदर्याच्या दर्शनाशिवायच माती व पाण्यात मिसळून जाल याची मला आशंका वाटते.

14

हे मित्रांनो!

जे सौंदर्य मर्त्य आहे त्यासाठी चिरंतन सौंदर्याचा त्याग करू नका आणि धुळीच्या नश्वर जगावर आपली आसक्ती जडू देवू नका.

15

हे चैतन्य पुत्रा!

एक असाही काळ येईल, जेव्हा पावित्र्याची कोकिळा आंतरिक रहस्यांचे गूढ सांगणारे मधूर गीत-गान थांबवेल आणि तुम्ही सर्व श्रेष्ठत्वाच्या वाणीपासून आणि स्वर्गीय संगीतापासून पूर्णपणे वंचित राहाल.

16

हे निष्काळजीपणाच्या सारतत्वा!

केवळ एका भाषणात अगणित रहस्यमय जिव्हा उद्घोष व्यक्त करतात आणि एका संगीत सुरातून असंख्य दडलेली रहस्ये प्रगट होतात; तथापि, ते ऐकण्यासाठी श्रवणातूर कर्ण नाहीत आणि ते समजण्यासाठी ग्रहनक्षम हृदय नाहीत.

17

हे साथीदारांनो!

ज्याच्या पलिकडे दुसरे स्थान नाही अशा अमर्याद राज्याचे महाद्वार साधकांसाठी खुले आहे आणि भक्तांच्या रक्ताने प्रियतमाचे निवासस्थान श्रृंगारले आहे, परंतु या स्वर्गीय नगरात प्रवेश करणाऱ्यांची संख्या अल्पच आहे या अल्प संख्येतही शुद्ध हृदयाने आणि पवित्र चैतन्याने युक्त असलेले अगदीच मोजके आहेत.

18

हे सर्वोच्च नंदनवनातील निवासियांनो!

दृढ श्रद्धेच्या बालकांना जाहीर करा की, पवित्र राज्यात नंदनवनाजवळ एक नवी फुलबाग निर्माण झाली आहे, जिच्याभोवती उच्च राज्यातील निवासी तसेच सर्वोच्च नंदनवनातील अमर निवासी परिक्रमा करीत आहेत. म्हणून ते स्थान प्राप्त करण्यासाठी, त्याच्या पवन पुष्पांपासून प्रेमाची रहस्ये उलगडण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत फळापासून दैवी आणि परिपूर्ण बुद्धिमत्तेचे रहस्य जाणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यांचे नेत्र सांत्वनाविभोर होतात जे त्यात प्रवेश करतात व निवास करतात!

19

हे माझ्या मित्रांनो!

सर्ववैभवशाली नंदनवनात लावलेल्या जीवनवृक्षाच्या सावलीत माझ्या सान्निध्यात तुम्ही सर्व जमले होता, तेव्हाची ती सत्य व दिव्य प्रभात, त्या पवित्र व अनुग्रहित परिसरास तुम्ही विसरला आहात काय? आश्चर्याने व आदराने तुम्ही माझ्या या तीन पवित्र उक्तींचे लक्षपूर्वक श्रवण केले: मित्र हो! माझ्या इच्छेपेक्षा स्वतःच्या इच्छेला अधिक महत्व देऊ नका; तुमच्यासाठी मी जे इच्छिले नाही, त्याची कदापि इच्छा बाळगू नका; ऐहिक आकांक्षांनी व इच्छांनी कुजलेली निर्जीव हृदये घेऊन माझ्याजवळ येऊ नका. तुम्ही जर आपले आत्मे पवित्र कराल, तर या घडीसच ते स्थळ व तो परिसर तुमच्या स्मरणात येतील व माझ्या उद्घोषाचा सत्यार्थ तुम्हा सर्वांना उघड होईल.

“नंदनवनाच्या पाचव्या पत्रिकेतील” परम पवित्र ओळींच्या आठव्या ओळीमध्ये ते सांगतात:

20

बेपर्वाईच्या शय्येवर मृताप्रमाणे पडलेल्या जन हो!

युगानुयुगे निघून घेली आणि तुमचे मौल्यवान जीवन संपुष्टात आले आहेत, तरीदेखील तुमच्यापासून आमच्या पावित्र्याच्या राजदरबारापर्यंत एकही पवित्रतेचा श्वास पोहचला नाही. तुम्ही असद्धर्माच्या महासागरात गर्क झालात, तरी तुमच्या ओठांनी तुम्ही परमेश्वराची सत्य श्रद्धा प्रगटपणे मान्य करता. मी ज्याला हीन लेखले आहे त्याच्यावर तुम्ही प्रेम केले आहे आणि माझ्या शत्रूला तुम्ही मित्र केले आहे. माझी पृथ्वी जरी तुम्हास विटलेली आहे आणि तिच्यातील प्रत्येक वस्तू तुम्हास वर्ज्य करिते तरीदेखील इकडे दुर्लक्ष करून तुम्ही संतुष्ट आणि प्रसन्नचित्ताने माझ्या पृथ्वीवर वावरता. तुम्ही तुमचे नेत्र उघडले तर खरोखर या आनंदापेक्षा अनेकानेक दुःखे पसंत कराल आणि जीवनापेक्षा प्रत्यक्ष मृत्यु चांगला मानाल.

21

हे धुळीच्या चलत स्वरूपा!

मी तुझ्याशी सुसंवाद इच्छितो, परंतु तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. तुझ्या विद्रोहाच्या तलवारीने तू आपल्या आशेचा वृक्ष तोडून टाकला आहे. सदासर्वकाळी मी तुझ्याजवळ आहे, परंतु अद्यापही तू माझ्यापासून दूर आहेस. अविनाशी वैभव मी तुझ्यासाठी निवडले आहे, तरी अमर्यादित लज्जा तू तुझ्यासाठी निवडली आहेस. तेव्हा अजूनही वेळ आहे, परत ये आणि तुझी संधी दवडू नकोस.

22

हे वासनेच्या पुत्रा!

विद्वान व सुज्ञ लोकांनी सर्ववैभवशाली परमेश्वराचे सानिध्य मिळविण्यासाठी कित्येक वर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि ते अपयशी झाले आहेत; त्यांनी त्यांच्या शोधात आपले जीवन खर्ची घातले आहे, तरी देखील त्यांनी त्याच्या मुखकमलाचे सौंदर्य पाहिले नाही. तू काहीही प्रयत्न न करता तुझे लक्ष्य गाठलेस व कोणताही शोध न घेता तुझे ध्येय साध्य केलेस. तरी देखील स्वार्थाच्या आवरणामध्ये तू इतका अवगुंठित राहिलास, की तुझ्या नेत्रांनी प्राणेश्वराचे सौंदर्य पाहिले नाही, तसेच तुझ्या हाताने त्याच्या दरबारी झग्याच्या जरतारी किनारीस स्पर्श केला नाही. तथापि तुम्ही नेत्र असणाऱ्यांनो, पहा आणि विस्मयित व्हा.

23

हे प्रेमनगराच्या निवसियांनो!

प्राणान्तिक फुंकरांनी चिरंतन ज्योतीभोवती गराडा घातला आहे, आणि दिव्य चिरतारुण्याचे सौंदर्य धुळीच्या अंध:कारामध्ये झाकाळले गेले आहे. प्रेम सम्राटांचा प्रमुख जुलमी सत्ताधाऱ्यांकडून अन्यायाने दोषी बनविला गेला आहे आणि पावित्र्याचे कबुतर घुबडांच्या पंजामध्ये बंदिस्त पडले आहे. ऐश्वर्याच्या मंडपातील रहिवासी आणि स्वर्गीय समूह विलाप आणि आक्रोश करतात, तेव्हा तुम्ही उपेक्षेच्या राज्यात विसावा घेता आणि खरे मित्र म्हणून स्वतःचा आदर करून घेता. किती व्यर्थ आहेत तुमच्या कल्पना!

24

मुर्ख असूनही शहाणे म्हणून संबोधून घेणाऱ्यांनो!

तुम्ही मेंढपाळांचा पेहराव का घेता, जेव्हा अंतरंगाने तुम्ही लांडगे बनून माझ्या कळपावर दुष्ट नजर ठेवता? तुम्ही त्या ताऱ्याप्रमाणे आहात, जो उष:कालापूर्वी उदयास येतो आणि प्रकाशमान व चकाकणारा भासत असला तरी माझ्या नगरीच्या वाटसरूंना सर्वनाशाच्या मार्गांनी भटकावयास लावतो.

25

वरपांगी नितिमान तरी अंतरंगी मलीन असणाऱ्यांनो!

तुम्ही स्वच्छ परंतु कडू पाण्याप्रमाणे आहात, जे वरपांगी स्फटिकाप्रमाणे निर्मळ दिसते, परंतु स्वर्गीय परीक्षकाने ते चाखून पाहिले तर त्यातील एकही थेंब स्वीकारला जाणार नाही. पहा सूर्यकिरणे धुळीवर आणि आरशावर सारखीच पडतात, परंतु त्यांचे प्रतिबिंब इतके भिन्न असते, जसे की पृथ्वी व ताऱ्यातील अंतर, जे न मोजता येणारे आहे.

26

हे माझ्या नामधारी मित्रा!

क्षणभर मनन कर. मित्र व शत्रु एका हृदयात वास करतात हे तू कधी ऐकले आहेस? तेव्हा अपरिचितास हुसकावून लाव, ज्यायोगे दिव्य मित्र स्वतःच्या घरात प्रवेश करू शकेल.

27

हे धुली पुत्रा!

ब्रम्हांडातील सर्व वस्तू मी तुझ्यासाठी योजिल्या आहेत. केवळ मानवी हृदय मी माझ्या सौंदर्याचे व वैभवाचे निवासस्थान केले आहे तरी तू माझे निवासस्थान माझ्याशिवाय दुसऱ्यास दिलेस. माझ्या पावित्र्याच्या साक्षात्काराने जेव्हा जेव्हा आपले निवासस्थान शोधले तेव्हा त्याला एक अपरिचित तेथे आढळला, आणि त्या गृहहीनाने प्राणेश्वराच्या देवालयाकडे त्वरा केली, तथापि मी तुझे गूढ लपविले आहे आणि तुझा मानभंग इच्छिला नाही.

28

हे आकांक्षेच्या सारतत्वा!

कित्येक प्रातःकाली स्थलातीताच्या साम्राज्यापासून मी तुझ्या निवासाकडे वळलो आणि सुखशय्येवर तू मला विसरून इतरांबरोबर व्यस्त असलेला आढळलास. त्यानंतर मी क्षणातच स्वर्गीय वैभवाच्या साम्राज्याकडे परतलो आणि माझ्या उच्च पूर्वस्थळी पावित्र्याच्या मेळाव्यापुढे काहीच उच्चार केला नाही.

29

हे कृपेच्या पुत्रा!

शून्यत्वाच्या फोलपणातून माझ्या सत्तेच्या चिखलाने मी तुला दृष्टोत्पत्तीस आणिले आणि तुझ्या प्रशिक्षणासाठी अस्तित्वातील प्रत्येक अणूची आणि सर्व निर्मिलेल्या वस्तुंच्या सार तत्त्वाची योजना केली आहे. अशा प्रकारे, तू मातेच्या गर्भातून जन्मण्यापूर्वी, मी तुझ्यासाठी दुधाचे दोन चकाकणारे झरे, तुझा सांभाळ करणारे डोळे आणि तुझ्यावर प्रेम करणारी हृदये नियोजित केली. माझ्या प्रेमळ कृपाळूपणाने, माझ्या दयेच्या छायेखाली मी तुझी जोपासना केली आणि माझ्या अनुग्रहाने व कृपेच्या सत्त्वाने तुझा सांभाळ केला. या सर्वांमध्ये माझा हेतू असा होता, की तू माझ्या चिरकालिक राज्याप्रत पोहचावे आणि माझ्या अदृश्य देणग्यांसाठी पात्र बनावेस, तरीही तू निष्काळजी राहिलास आणि जेव्हा पूर्ण वाढलास, तेव्हा तू माझ्या सर्व कृपाप्रसादाकडे दुर्लक्ष केलेस आणि तुझ्या निष्क्रीय कल्पनांमध्ये तू स्वतःस इतके गुंतवून घेतलेस, की त्यामुळे तू पूर्णपणे विसराळू झालास आणि सन्मित्राच्या द्वारांपासून विमुख होऊन माझ्या शत्रूंच्या दरबारामध्ये आधीन राहिलास.

30

हे जगाच्या वेठ गुलामा!

कित्येक प्रातःकाळी माझ्या प्रेममय कृपेचा मंदवायू तुझ्यावरून तरंगत गेला आणि तू निष्काळजीपणाच्या शय्येवर प्रगाढ निद्रेत आढळलास. तेव्हा तुझ्या दुरावस्थेवर विलाप करीत तो जेथून निघाला तेथे परत आला.

31

हे पृथ्वी पुत्रा!

जर तुला मी हवा असेन तर माझ्या व्यतिरिक्त अन्य कशाचीही अपेक्षा करू नकोस; आणि तू माझे सौंदर्य पाहू इच्छितोस, तर जगासाठी आणि त्यामधील सर्वांसाठी तुझे नेत्र बंद कर; कारण माझी इच्छा आणि माझ्या व्यतिरिक्त अन्य कुणाचीही इच्छा, अग्नी व जलाप्रमाणे, एका हृदयात एकत्र वास करू शकत नाहीत.

32

हे मित्र बनलेल्या अपरिचिता!

तुझ्या अंतःकरणातील दीपज्योती माझ्या सामर्थ्याच्या हस्ते प्रज्ज्वलित करण्यात आली, स्वार्थ आणि वासना यांच्या विरोधी वाऱ्यांनी तिला विझवू नकोस. तुझ्या सर्व रोगांचा उपचार म्हणजेच माझे स्मरण होय, हे विसरू नकोस. माझे प्रेम तुझा ठेवा बनव आणि प्रत्यक्ष तुझी मनोमनी दृष्टि आणि जीवन याप्रमाणे त्यास जपून ठेव.

33

हे माझ्या बंधु!

माझ्या मधुरसपूर्ण जिव्हेचे आनंदमय शब्द श्रवण कर आणि माझ्या शर्करा स्त्रवणाऱ्या ओठांनी रहस्यमय पावित्र्याच्या झऱ्याचे रसपान कर. तुझ्या हृदयाच्या पवित्र मातीत माझ्या दैवी प्रज्ञाबुद्धीच्या बीजांची पेरणी कर आणि दृढ निष्ठेच्या जलाने त्यांचे सिंचन कर, ज्यामुळे तुझ्या हृदयाच्या पवित्र नगरात माझ्या ज्ञानाची व प्रज्ञेची टवटवीत हिरवी गर्द सुवासिक फुलझाडे बहरतील.

34

हे मम नंदनवनाच्या निवसियांनो!

नंदनवनाच्या पवित्र बागेत तुझ्या मैत्रीचे व प्रेमाचे रोपटे मी प्रेममय दयेच्या हातांनी लावले आहे आणि माझ्या कोमल कृपेच्या उत्कृष्ट तुषारांनी त्याचे सिंचन केले आहे. त्याला आता फळे येण्याची वेळ आली आहे, तेव्हा त्याचे संरक्षण कर आणि ते आकांक्षा व वासना यांच्या ज्वालांनी दग्ध होणार नाही यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न कर.

35

हे माझ्या मित्रांनो!

तुम्ही प्रमादाचा दिपक मालवून टाका आणि तुमच्या हृदयात दैवी मार्गदर्शनाची चिरकालिक मशाल प्रकाशित करा. कारण लवकरच मानवजातीचे परीक्षक, पूजनीयाच्या पवित्र सान्निध्यात, शुध्दोत्तम सद्गुण व निष्कलंक पावित्र्याची कृत्ये यांच्याशिवाय काहीही स्वीकारणार नाहीत.

36

हे धुली पुत्रा!

ज्याप्रमाणे याचक भेटेपर्यंत मधुबाला आपला चषक सामोरे करीत नाही, आणि प्रेमी त्याच्या प्रियतमाच्या सौंदर्याला डोळे भरून पाहीपर्यंत हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून धावा करीत नाही, तद्वत श्रवणातूर भेटल्याशिवाय जे भाषण करीत नाहीत ते सुज्ञ असतात. याकरिता अंतःकरणाच्या पवित्र भूमीत ज्ञान व सुज्ञपणाच्या बीजांची पेरणी कर आणि दैवी प्रज्ञेच्या शुभ्र सुगंधी फुलझाडांचा उदय, चिखल व गाळातून नव्हे तर तो हृदयात होईपर्यंत त्यांना लपवून ठेव.

“पवित्र पत्रिकेच्या प्रथम पंक्तीत नमूद केलेले व लिहिलेले आहे, आणि परमेश्वराच्या पवित्र मंडपातील अभयस्थानी हे रहस्य लपलेले आहे.”

37

हे मम सेवका!

जे नाशवंत आहे त्यासाठी चिरकालिक अधिराज्याचा त्याग करू नकोस आणि ऐहिक आकांक्षासाठी स्वर्गीय सार्वभौमत्वास झुगारून देऊ नकोस. ही चिरंतन जीवनाची नदी आहे जी दयाघनाच्या लेखणीच्या महान झऱ्यापासून वाहत आली आहे. जे त्याचे रसपान करतात त्यांचे कल्याण आहे.

38

हे चैतन्याच्या पुत्रा!

तुझा पिंजरा तोडून बाहेर पड आणि प्रेमाच्या स्वभस्मजन्य फिनिक्स पक्षाप्रमाणे पावित्र्याच्या उत्तुंग आकाशात भरारी मार. तुझ्या मी पणाचा त्याग कर आणि दयेच्या चैतन्याने भारावलेल्या स्थितीत, स्वर्गीय पावित्र्याच्या राज्यात निवास कर.

39

हे धुळीच्या अपत्या!

सुखाने दिवस घालविण्यात समाधान मानू नकोस आणि स्वतःस चिरकालिक विश्रांतीपासून वंचित करू नकोस. चिरंतन सुखाच्या बागेची अदलाबदल नश्वर जगातील मातीच्या ढिगाऱ्याशी करू नकोस. तुझ्या बंदिवासाबाहेर पडून उंच वैभवशाली हिरवळीकडे आरोहण कर आणि तुझ्या मर्त्य पिंजऱ्यापासून दिव्य स्थलातीताच्या नंदनवनाकडे उड्डाण कर.

40

हे मम सेवका!

या जगाच्या बंधनांपासून स्वतःस मुक्त कर आणि स्वार्थाच्या बंदिवासापासून आपला आत्मा विमुक्त कर. ही संधी दडवू नकोस कारण पुन्हा ती तुला मिळणार नाही.

41

हे मम सेविका पुत्रा!

जर तू अमर सार्वभौमत्व पाहिले तर तू हे अति क्षणभंगुर जग सोडण्याचा आटोकाट प्रयत्न करशील. परंतु तुझ्यापासून एकास लपवून ठेवणे आणि दुसऱ्यास प्रगट करणे एक रहस्य आहे जे हृदयाने पवित्र असणाऱ्याशिवाय इतरास समजू शकणार नाही.

42

हे मम सेवका!

तुझे हृदय द्वेषापासून निष्कलंक आणि मत्सरापासून अजाण ठेव, मग पावित्र्याच्या दैवी राजदरबारात प्रवेश कर.

43

हे माझ्या मित्रांनो!

परम ‘मित्राच्या’ सुप्रसन्नतेच्या मार्गांनी तुम्ही वाटचाल करा, आणि ‘त्याच्या’ निर्मित प्राणिमात्रांच्या संतोषात ‘त्याची’ सुप्रसन्नता आहे याची जाणीव ठेवा. म्हणजे: कोणत्याही मनुष्याने आपल्या मित्राच्या निवासस्थानी त्याच्या इच्छेशिवाय प्रवेश करू नये, त्याची सम्पत्ती हरण करू नये, किंवा मित्राच्या इच्छेपेक्षा स्वतःची इच्छा श्रेष्ठ मानू नये आणि त्याच्या लाभापेक्षा अधिक लाभ कदापि शोधू नये. हे अंतर्दृष्टी असणाऱ्यांनो, यावर मनन करा!

44

हे माझ्या राजसिंहासनाच्या सोबत्या!

अनिष्ट ते श्रवण करू नकोस आणि पाहू नकोस, स्वतःची मानहानी होऊ देऊ नकोस, उसासे टाकू नकोस किंवा रुदन करू नकोस. तुला जे बोलले ते तू ऐकू शकणार नाही असे वाईट संभाषण करू नकोस, इतरांच्या दोषांची अतिशयोक्ती करू नकोस ज्यायोगे तुझे दोष मोठे दिसू नयेत, आणि कुणाच्याही मानहानीची इच्छा करू नकोस ज्यायोगे तुझ्या स्वतःचा मानभंग उघड होऊ नये. म्हणून तुझ्या आयुष्याचे दिवस, जे क्षणमात्रापेक्षाहि अल्प आहेत, निष्कलंक मनाने, निर्विकल्प हृदयाने, पवित्र विचाराने आणि निर्मळ स्वभावाने व्यतीत कर, ज्यायोगे मुक्त व तृप्त होऊन तू या नश्वर देहाचा त्याग करू शकशील, रहस्यमय स्वर्गाकडे गमन करशील आणि अमर राज्यामध्ये चिरंतन निवास करू शकशील.

45

अरेरे! अरेरे! हे ऐहिक वासनेच्या प्रेमींनो!

विद्युतगतीने एकमेव प्राणेश्वरास अंतरलात आणि तुम्ही तुमची अंतःकरणे सैतानी भ्रमांच्या नादाला लावली. तुमच्या निरर्थक कल्पनेस शरण येऊन तिलाच तुम्ही सत्य मानिले. तुमची दृष्टी काट्याकडे वळवून त्यालाच तुम्ही फुल मानिले. तुम्ही पावित्र्याचा एकही श्वास घेतला नाही किंवा विरक्तीची एकही झुळूक तुमच्या हृदयाच्या हिरवळीवरून वाहिली नाही. तुम्ही प्रियतमाचे प्रासादिक उपदेश वाऱ्यावर सोडून दिले आहेत आणि त्यांना तुमच्या हृदय पत्रिकेपासून पूर्णपणे पुसून टाकले आहे. मैदानावरील रानटी पशूंप्रमाणे तुम्ही भटकता आणि आकांक्षा व वासना यांच्या कुरणांमध्ये आपले अस्तित्व बाळगता.

46

हे सहप्रवासी बांधवांनो!

तुम्ही एकमेव प्राणेश्वराचा उल्लेख करण्याकडे दुर्लक्ष का केले आहे आणि स्वतःस त्याच्या पवित्र सान्निध्यापासून दूरवर का ठेवले आहे? अतुल्य मंडपात वैभवाच्या सिंहासनावर मूर्तिमंत सौंदर्याचे सारतत्व विराजमान आहे; परंतु तुम्ही मात्र निरर्थक कलहांमध्ये स्वतःस गुंतवून घेतले आहे. पावित्र्याचे मधुर सुगंध दरवळत आहेत आणि कृपाप्रसादाचा उच्छवास तरंगत आहे, तरी तुम्ही सर्व त्यापासून वंचित राहिलेले आणि अत्यंत पीडीत झालेले आहात. तुमच्याविषयी आणि जे तुमच्या मार्गांवर चालतात व तुमची पावले अनुसरतात त्यांच्याविषयी, अरेरे, दुःख वाटते!

47

हे आकांक्षेच्या बालकांनो!

व्यर्थ गर्विष्ठपणाचा पोषाख काढून टाका आणि आत्मप्रौढीच्या वस्त्रापासून स्वतःस अलिप्त ठेवा.

अदृश्याच्या लेखणीकडून लिहिलेल्या रत्नजडित पत्रिकेमधील अत्यंत पवित्र ओळींपैकी तिसऱ्या ओळीमध्ये खालीलप्रमाणे प्रगट झाले आहे:

48

हे बांधवांनो!

एकमेकांशी सहिष्णु असावे आणि निम्नदर्जाच्या वस्तूंवर आपली आसक्ति ठेवू नये. आपल्या वैभवात स्वतःचा गर्व करू नये आणि मानभंगाविषयी लज्जित होऊ नये. माझ्या सौंदर्याची साक्ष! मी सर्व वस्तू धुळीपासून निर्माण केल्या आहेत, आणि त्यांना पुनः धुळीमध्येच परत करीन.

49

हे धुळीच्या बालकांनो!

गरीबांच्या मध्यरात्रीच्या उसाशांविषयी श्रीमंतांना जागरूक करा, नाही तर निष्काळजीपणा त्यांना सर्व विनाशाच्या मार्गावर नेईल आणि त्यांना दिव्य संपत्तीच्या वृक्षापासून वंचित करील. दातृत्व व औदार्य माझे गुणधर्म आहेत; त्याचे कल्याण असो, जो माझ्या सद्गुणांनी स्वतःस भूषवितो.

50

हे मनोविकारांच्या साररूपा!

सर्व लोभलालसा सोड आणि संतोष प्राप्त कर; कारण लोभी सदोदित वंचित राहिले आहेत आणि आत्मसंतुष्ट सदैव प्रेम व स्तुतीप्राप्त राहिले आहेत.

51

हे मम सेविका-पुत्रा!

दारिद्र्यामध्ये त्रस्त होऊ नकोस तसेच समृद्धीवर विश्वास ठेवू नकोस, कारण गरीबीमागून श्रीमंती आणि श्रीमंतीमागून गरीबी येते. तथापि परमेश्वराव्यतिरिक्त सर्व बाबतीत गरीब असणे ही एक अलौकीक देणगी होय. या विषयीचे मूल्य कमी लेखू नकोस, कारण त्यामुळे सरतेशेवटी तुला परमेश्वरी महत्तेची श्रीमंती लाभेल आणि याप्रकारे तू या उद्घोषाचा अर्थ ज्ञात करशील, “सत्यतः तुम्ही गरीब आहात”, आणि ह्या पवित्र शब्दांचा अर्थ समजून घ्याल, “परमेश्वर सर्व अधिपति आहे”, जेव्हा प्रियकराच्या हृदय-क्षितिजावर सत्य प्रभात वैभव संपन्न तेजाने उदयास येईल, त्यावेळी तू संपन्नतेच्या सिंहासनावर सुरक्षितपणे स्थानापन्न होशील.

52

हे निष्काळजीपणा व मनोविकारांच्या बालकांनो!

तुम्ही माझ्या घरात माझ्या शत्रुला प्रवेश करू दिला आहे आणि माझ्या मित्राला बाहेर घालविले आहे, कारण तुम्ही तुमच्या हृदयात माझ्याशिवाय दुसऱ्यांचे प्रेम प्रतिष्ठापित केले आहे. मित्राच्या कथनांचे मनःपूर्वक श्रवण करा आणि त्याच्या नंदनवनाकडे वळा. ऐहिक मित्र स्वतःच्या स्वार्थ-सिद्धीसाठी एकमेकांवर प्रेम करतांना दिसतात, परंतु सन्मित्राने तुमच्यासाठीच तुमच्यावर प्रेम केले आणि प्रेम करीत आहे आणि खरोखरच त्याने तुमच्या मार्गदर्शनासाठी अगणित यातना भोगल्या आहेत. अशा अनुपम मित्राशी विश्वासघातकी होऊ नका, तर त्याच्याकडे त्वरीत धाव घ्या. सर्व नामधारक परमस्वामीच्या लेखणीच्या क्षितिजावर सत्य व श्रद्धेच्या वचनांचा हा दिनमणि उदयास आला आहे. तुमचे कर्ण उघडा, ज्यायोगे तुम्ही संकटात सहाय्यक व स्वयंभू अशा परमेश्वराचे वचन श्रवण करू शकाल.

53

हे तुम्ही नाशंवत संपत्तीचा गर्व करणाऱ्यांनो!

तुम्ही हे सत्य समजा की संपत्ती ही साधक आणि त्याचे साध्य, भक्त आणि त्याचा प्रियतम यांच्यामध्ये एक बळकट आडकाठी आहे. काही अपवाद सोडल्यास, श्रीमंत प्राणेश्वराच्या सान्निध्य-दरबारात कदापि पोहचणार नाहीत, तसेच संतोष व आत्मसमर्पणाच्या नगरात ते प्रवेश करणार नाहीत. तथापि त्याचे कल्याण आहे जो श्रीमंत असूनही आपल्या संपत्तीमुळे शाश्वत राज्यापासून अडविण्यात आला नाही किंवा त्यामुळे अविनाशी राज्यसत्तेपासून वंचित झाला नाही. सर्व महान नामाची साक्ष! अशा श्रीमंताचे तेज स्वर्गीय रहिवाश्यांना प्रकाशित करील, जसे पृथ्वीवरील लोकांना सूर्य प्रकाशित करतो.

54

हे पृथ्वीवरील श्रीमंतांनो!

तुमच्यामधील गरीब माझा ठेवा आहेत, माझ्या ठेव्याचा तुम्ही सांभाळ करा, आणि केवळ तुमच्या स्वतःच्या आरामाकडे लक्ष देऊ नका.

55

हे वासना पुत्रा!

संपत्तीच्या मलीनपणापासून स्वतःस स्वच्छ कर आणि पूर्ण शांतीने गरीबीच्या राज्याकडे वाटचाल कर, ज्यायोगे अनासक्तीच्या झऱ्यापासून तू अमर जीवनाचे अमृतपान करू शकशील.

56

हे माझ्या सुपुत्रा!

अधार्मिकाचा सहवास दुःख वाढवितो, परंतु सत्यनिष्ठांची संगती हृदयापासून विकारांची काजळी दूर करून ते स्वच्छ करते. जो परमेश्वराशी संवाद साधू इच्छितो त्याने त्याच्या प्रियजनांच्या संगतीत आश्रय घ्यावा आणि जो परमेश्वरीय वचनांचे श्रवण करू इच्छितो त्याने त्याच्या निवडक जनांची वचने लक्षपूर्वक ऐकावीत.

57

हे धुली पुत्रा!

सावधान! अधार्मिकाची सोबत धरू नकोस आणि त्याच्याशी मैत्री साधू नकोस, कारण असे सख्यत्व हृदयाचे तेज नरकाग्नीत परिवर्तित करते.

58

हे मम सेविका पुत्रा!

तू पवित्र चैतन्याची कृपा शोधत असशील, तर सज्जनांचा सहवास प्राप्त कर कारण त्याने अमर चषक-धारकाच्या हातांनी चिरंतन जीवनाचे अमृतपान केले आहे आणि हे असे आहे, जसे सत्य सुप्रभात मृतांची हृदये संजीवित आणि प्रकाशित करते.

59

हे उपेक्षा करणाऱ्यांनो!

हृदयांची रहस्ये लपलेली आहेत असा विचार करू नका, नव्हे, तुम्ही निश्चितपणे समजून घ्या की, ती रहस्ये स्पष्ट अक्षरामध्ये कोरलेली आणि पवित्र सान्निध्यात उघडपणे प्रगट झालेली आहेत.

60

हे मित्रांनो!

खरोखर, मी सांगतो, तुम्ही जे काही आपल्या हृदयात लपवून ठेवलेले आहे, ते आम्हास दिवसाप्रमाणे स्पष्ट आणि उघड आहे; परंतु जे लपलेले आहे, ते तुमच्या पात्रतेमुळे नव्हे तर आमच्या कृपेने व दयेने तसे आहे.

61

हे मानव पुत्रा!

मी माझ्या दयेच्या अगाध महासागरातून, एक दवबिंदू जगाच्या लोकांवर शिंपडला आहे, तरी त्यासाठी कोणीही आतुर झालेले आढळले नाही; इतकेच नव्हे तर ऐक्याच्या स्वर्गीय अमृतापासून प्रत्येकजण दूर झाला असून अपवित्रतेच्या घाणेरड्या गाळाकडे वळला आहे आणि मर्त्य चषकाने समाधानी होऊन त्याने अमर सौंदर्याच्या महाचषकाचा अव्हेर केला आहे. ज्यामध्ये तो समाधानी आहे, ते निकृष्ट आहे.

62

हे धुली पुत्रा!

अमर प्रियतमाच्या अद्वितीय अमृतापासून तुझे डोळे फिरवू नकोस आणि अमंगल व नश्वर गाळाकडे लक्ष देऊ नकोस. दैवी चषकधारकाच्या हातून अमर जीवनाचे महाचषक घे, ज्यामुळे सर्व बुद्धिमत्ता तुझी राहील आणि अदृश्याच्या राज्यापासून ध्वनित होणाऱ्या गूढ गुंजनाचे तू श्रवण करशील. आक्रोश करा, हे हीन उद्देश बाळगणाऱ्यांनो! माझ्या पवित्र व अमर अमृतापासून विमुख होऊन क्षणभंगूर जलाकडे का वळला आहात?

63

हे जगातील लोकांनो!

निश्चित जाणा की तुमच्यामागे अप्रतिक्षीत आपत्ती येत आहे आणि दुःखदायी अतिगंभीर प्रायश्चित तुमची प्रतिक्षा करीत आहे. असे समजू नका की तुमची कुकृत्ये माझ्या दृष्टीतून नाहीशी झाली आहेत. माझ्या सौंदर्याची शपथ! माझ्या लेखणीने तुमची सर्व कृत्ये सुवर्ण पाषाणाच्या शलाकांवर उघड शब्दांनी कोरून ठेवली आहेत!

64

हे पृथ्वीच्या अत्याचारी लोकांनो!

तुमचे हात जुलमांपासून मागे घ्या, कारण मी प्रतिज्ञा केली आहे की, मी कोणत्याही मनुष्याच्या अन्यायास क्षमा करणार नाही. हा माझा करारनामा आहे जो रद्द न होणारी आज्ञा म्हणून माझ्या संरक्षित पत्रिकेतून फर्मावला आहे आणि त्यावर माझी मोहर मुद्रांकित केली आहे.

65

हे बंडखोरांनो!

माझ्या क्षमाशीलतेने तुम्हास निर्भिड केले असून माझ्यावरील दिर्घकाळ छळाने तुम्हांस इतके बेफीकीर बनविले आहे की तुम्ही विनाशाकडे जाणाऱ्या संकटमय मार्गावर मनोविकारांच्या तल्लख घोड्यावर स्वार होऊन भरधाव निघाला आहात. काय तुम्ही मला बेसावध किंवा याबद्दल अनभिज्ञ समजला आहात?

66

हे अप्रवासी लोकांनो!

मी परमेश्वराच्या स्तवनासाठी जी जिव्हा निर्मिली आहे, तिला निंदेने अपवित्र करू नका. अहंकाराच्या अग्नीने तुम्हास ग्रासले तर माझ्या प्राणीमात्रांचे दोष लक्षात घेण्याऐवजी आपले स्वतःचे दोष लक्षात आणा, कारण की प्रत्येकजण इतरांना जेवढा जाणतो, त्यापेक्षा आपणा स्वतःस तो अधिक चांगल्या प्रकारे जाणतो.

67

हे भ्रमाच्या बालकांनो!

निश्चित जाणा की, जेव्हा प्रकाशमय उषःकाल अमर पावित्र्याच्या क्षितीजावर उदयास येईल, तेव्हा रात्रीच्या काळोखात झालेली सैतानी गुपिते व कृत्ये जगातील लोकांसमोर उघडी पडतील व व्यक्त होतील.

68

हे धुळीतून उगवणाऱ्या कुचकामी गवता!

तुझ्या या मलीन हातांनी प्रथम आपल्या स्वतःच्या पोषाखास का स्पर्श केला नाहीस आणि आकांक्षा व मनोविकारांनी कलंकित अशा आपल्या हृदयाने तू माझ्याशी तादात्म्य साधण्यासाठी आणि माझ्या पवित्र साम्राज्यात प्रवेश करण्यासाठी का धडपडतोस? तुम्ही ज्याची आकांक्षा करता त्यापासून दूर, अतिदूर आहात.

69

हे आदि पुरुषाच्या बालकांनो!

पावन वचने आणि शुद्ध व उत्तम कृत्ये ईश्वरी वैभवाच्या स्वर्गाकडे आरोहण करतात. त्यासाठी तुमची कृत्ये अहंकार व मिथ्या दंभाच्या धुळीपासून स्वच्छ करण्याचा आणि वैभवाच्या राज दरबारात तुम्हासाठी कृपा मिळविण्याचा झटून प्रयत्न करा. कारण लवकरच मानवजातीचे परीक्षक एकमेव आराध्यदेवाच्या पवित्र सान्निध्यात परिपूर्ण सद्गुण व निष्कलंक पावित्र्याची कृत्ये याशिवाय इतर काहीही स्वीकारणार नाहीत. हा बुद्धीचा व दैवी रहस्याचा दिनमणि, ईश्वरी इच्छा शक्तीच्या क्षितिजावर चमकला आहे. ते आशीर्वादीत आहेत, जे त्याकडे वळतात.

70

हे ऐहिकतेच्या पुत्रा!

तू अस्तित्वाचे अधिराज्य मिळवशील, तर ते आनंददायी आहे; तू मरणाधीन विश्वापलीकडे निघून जाशील, तर सनातनाची सत्ता वैभवशाली आहे; तू स्वर्गीय तरुणाच्या हातांनी रहस्यमय महाचषकांचे प्राशन करशील, तर पवित्र परमानंद मधुर आहे. तू या पदाप्रत पोहचशील तर तू सर्वनाश व मृत्यु, काबाडकष्ट व पाप यांच्यापासून मुक्त होशील.

71

हे माझ्या मित्रांनो!

“झमान” च्या पावन परिसरात असलेल्या “परान” पर्वतावर माझ्याशी तुम्ही जो करारनामा केला आहे, तो लक्षात आणा. मी परमोच्च स्वर्गीय मेळाव्यास व अमरतेच्या नगरातील रहिवाशांना त्याचे साक्षी बनविले आहे, तरी देखील मला आता कोणीही त्या करारनाम्याशी प्रामाणिक असलेला आढळत नाही. निश्चितच गर्वाने व विद्रोहाने त्याला अशा प्रकारे अंतःकरणात पुसून टाकले आहे, की त्याचा लवलेशही शिल्लक नाही. हे जाणूनही मी प्रतिक्षा केली आणि ते उघडकीस आणले नाही.

72

हे मम सेवका!

तू उत्तम रीतीने धार लावलेल्या अशा तलवारीप्रमाणे आहेस जी तिच्या म्यानाच्या अंधःकारात झाकलेली आहे आणि तिचे मूल्य जाणकार कारागीरापासून लपलेले आहे. म्हणून, तुझी योग्यता सर्व जगावर प्रगट व स्पष्ट करण्यात यावी यासाठी अहंकार व वासनेच्या म्यानातून बाहेर ये.

73

हे माझ्या मित्रा!

तू माझ्या पवित्रतेच्या स्वर्गाचा दिनमणि आहेस, जगाच्या मालिन्याने तुझ्या तेजास ग्रहण लागू देऊ नकोस. निष्काळजीपणाचे पटल फाडून दूर कर, ज्यायोगे तू ढगांमधून तेजःपुंज बाहेर पडावेस आणि सर्व वस्तूंना जीवनाच्या वस्त्राने सुशोभित करावेस.

74

हे दांभिक बालकांनो!

तुम्ही क्षणिक सार्वभौमत्वासाठी माझ्या अविनाशी अधिपत्याचा त्याग केला आहे, आणि जगाच्या भडक मोहमायेने स्वतःस सजविले आहे आणि यात आपली बढाई मानली आहे. माझ्या दिव्य सौंदर्याची शपथ! मी सर्वांना मातीच्या एकरंगी आच्छादनाखाली एकत्र करीन आणि प्रत्येक रंगाहून शुध्द करण्यात येणाऱ्या व माझ्या स्वतःच्या निवडलेल्या रंगाशिवाय नाना प्रकारच्या या सर्व रंगांना पुसून टाकीन.

75

हे निष्काळजीपणाच्या बालकांनो!

नश्वर सार्वभौमत्वावर आपला लोभ ठेवू नका आणि त्याने हर्षित होऊ नका. तुम्ही त्या बेसावध पक्षीप्रमाणे आहात, जो निर्धास्तपणे फांदीवर कूजन करतो; की अचानक मृत्युरूपी फासेपारधी त्याला धुळीवर फेकून देतो आणि मधुर सूर, आकार व रंग यांचा लवलेशही मागे न ठेवता, तो नाहीसा होतो. म्हणून दक्षता घ्या, हे आकांक्षांच्या श्रृंखलाबद्ध गुलामांनो!

76

हे माझ्या सेविका पुत्रा!

अद्यापपर्यंत शब्दांनी सर्वकाळी मार्गदर्शन करण्यात आले आहे आणि आता ते कृतींनी करण्यात येत आहे. प्रत्येकासाठी शुद्ध व पवित्र कृत्यांचे प्रदर्शन करणे आवश्यक आहे, कारण शब्द सर्वसामान्यांच्या सार्वजनिक संपत्तीप्रमाणे असतात, परंतु अशाच कृत्यांचा केवळ आमच्या प्रिय भक्तांशीच संबंध असतो. तेव्हा तुमच्या कृत्यांनी आपले स्वतःचे वैशिष्ट्य स्पष्ट करण्यासाठी हृदयापासून आणि आत्मीयतेने प्रयत्न करा, याप्रमाणे ह्या पवित्र व तेजोमय पत्रिकेत आम्ही तुला उपदेश करतो.

77

हे न्यायाच्या पुत्रा!

रात्रप्रहरी अविनाशी जीवतत्वाचे सौंदर्य स्वामी निष्ठेच्या उच्च सिंहासनापासून ‘सद्रतुल-मुन्तहा’ (ईश्वरी अवतार) कडे परतले आहे आणि अशा प्रकारे विलाप केला आहे की उच्च राज्यातील जमावाने व तेथील रहिवाशांनी त्याचा आक्रोश पाहून आक्रंदन केले. त्यावर विचारण्यात आले, “कशासाठी आक्रंदन आणि विलाप?” त्याने उत्तर दिले: आज्ञाप्रमाणे मी विश्वासाच्या टेकडीवर आतुरतेने वाट पाहिली, परंतु भूलोकांतून स्वामी निष्ठेच्या सुगंधाचा एकही श्वास लाभला नाही. मग परतण्याची आज्ञा झाली तेव्हा मी पाहिले, भूतलावरील कुत्र्यांच्या पंजात पावित्र्याची काही कबुतरे जखमी अवस्थेत तडफडत होती. तेव्हा स्वर्गीय सेविका, तेजस्वी व निरावरण, तिच्या रहस्यमय प्रासादातून शीघ्रतेने पुढे आली आणि तिने त्यांची नावे विचारली आणि एका व्यतिरिक्त इतर सर्वांची नावे सांगण्यात आली. आणि जेव्हा आग्रह धरला तेव्हा त्याचे प्रथम अक्षर उच्चारण्यात आले, त्यावर स्वर्गीय दिवाणखान्यातील रहिवासी त्यांच्या वैभवाच्या निवासस्थानातून वेगाने पुढे आहे. आणि जेव्हा दुसरे अक्षर उच्चारण्यात आहे, तेव्हा ते सर्व धुळीवर खाली कोसळले. त्याक्षणी अति-आंतरिक देव्हाऱ्यातून एक ध्वनी ऐकू आला, “इतके पुरे व अधिक नको.” त्यांनी जे केले आहे व आता जे करीत आहेत त्याला खरोखर आम्ही साक्षी आहोत.

78

हे माझ्या सेविका पुत्रा!

दयावंताच्या जिव्हेतून प्रवाहित दैवी रहस्याच्या झऱ्याचे प्राशन कर आणि दैवी उद्घोषाच्या उदयस्थानावरून बुद्धिमत्तेच्या दिनमणीचे अनावृत तेज पहा. हृदयाच्या पवित्र मातीत माझ्या दैवी बुद्धिमत्तेच्या बीजांची पेरणी कर आणि दृढश्रद्धेच्या जलाने त्यांना पाणी दे, ज्यामुळे ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांची शुभ्र सुवासिक फुलझाडे अंतःकरणाच्या पवित्र नगरामध्ये टवटवीत आणि हिरवीगार उगवतील.

79

हे आकांक्षा पुत्रा!

तू आकांक्षेच्या राज्यात किती काळ भराऱ्या मारशील? मी तुला पंख दिले आहेत, ज्याने सैतानी भ्रमाच्या प्रांताकडे नव्हे तर रहस्यमय पावित्र्याच्या राज्याकडे तुला उडता यावे. मी तुला कंगवा दिला आहे तो माझा कंठ ओरबाडण्यासाठी नव्हे, तर माझ्या काळ्या केशबटांना विंचरण्यासाठी दिला आहे.

80

हे माझ्या सेवकांनो!

तुम्ही माझ्या बागेची झाडे आहात, तुम्ही उत्कृष्ट व अद्भूत फळे द्यावेत, ज्यामुळे तुम्ही आणि इतरांनी, त्यांच्यापासून लाभ घ्यावा. अशा प्रकारे व्यवसाय धंद्यात व कला कौशल्यात गुंतवून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, कारण यामध्ये संपत्तीचे रहस्य आहे, हे सुज्ञ मानवांनो! कारण परिणाम साधनांवर अवलंबून असतात आणि परमेश्वराची कृपा तुमच्यासाठी पूर्णपर्याप्त राहील. फळे न देणारी झाडे जाळण्यासाठी आहेत व पुढेही राहतील.

81

हे माझ्या सेवका!

सर्वात हीन माणसे ती आहेत जी पृथ्वीवर फळ देत नाहीत, अशी माणसे खरोखर मृतांमध्ये असल्यासारखी गणली जातात, नव्हे, परमेश्वराच्या दृष्टीत त्या निरुद्योगी आणि कुचकामी आत्म्यांपेक्षा मृत अधिक चांगले.

82

हे माझ्या सेवका!

सर्वोतम माणसे ती आहेत जी स्वतःच्या व्यवसायाने आपली उपजिविका कमावतात आणि आपल्या स्वतःवर व आपल्या बांधवांवर सर्व विश्वाचा स्वामी, परमेश्वराच्या प्रेमासाठी खर्च करतात.

“ईश्वरीय कृपेने व त्याच्या दिव्य दयेने, उद्घोषाच्या आवरणाखाली लपलेली रहस्यमय व अद्भुत नववधू, परमेश्वराच्या सौंदर्यापासून अवतरलेल्या तेजस्वी प्रकाशाप्रमाणे प्रगट करण्यात आली आहे. हे मित्रांनो! मी साक्ष आहे, की त्याची कृपा परिपूर्ण आहे, युक्तिवाद पूर्ण सफल झाला आहे, प्रमाण प्रगट झाले आणि पुरावा प्रस्थापित झाला. अनासक्तीच्या मार्गावर तुमच्या प्रयत्नांनी आता जे प्रगट होईल, ते आता पहावयाचे आहे. याप्रमाणे तुमच्यासाठी आणि जे स्वर्गात व पृथ्वीवर आहेत, त्यांच्यासाठी दैवी कृपेचा पूर्णपणे अनुग्रह झाला आहे. सर्व विश्वांचा स्वामी परमेश्वर, त्याचे सर्व स्तवन असो!”

Bahá'u'lláh

Windows / Mac